अस्वल झाडावर अन् बघ्यांची गर्दी रस्त्यावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:09 AM2021-02-27T04:09:43+5:302021-02-27T04:09:43+5:30
उमरेड : चौफेर जंगलाने वेढलेल्या लोहारा शिवारात कधी वाघोबा, कधी बिबट, तर अन्य वन्यप्राणी नजरेस पडत असतात. त्यात आणखी ...
उमरेड : चौफेर जंगलाने वेढलेल्या लोहारा शिवारात कधी वाघोबा, कधी बिबट, तर अन्य वन्यप्राणी नजरेस पडत असतात. त्यात आणखी एका अस्वलाच्या दर्शनामुळे गुरुवारी सायंकाळी ८ ते रात्री २ वाजेपर्यंत वनविभागाची तारांबळ उडाली. अस्वल दिसल्याची आणि झाडावर बसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच शेकडो बघ्यांनी रस्त्यावरच गर्दी केली. कोरोनाच्या विपरित परिस्थितीत उसळलेल्या गर्दीवर आश्चर्य व्यक्त होत आहे.
उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रातील लोहारा बीट येथे एका दुचाकी वाहन चालकाला अस्वल आडवे गेले. अस्वलामुळे वाहन चालक घाबरला आणि ओरडला. अस्वल दचकले. लगतच्याच कडुनिंबाच्या झाडावर अस्वलाने धूम ठोकत ठाण मांडली. अस्वल झाडावर चढताच ये-जा करणाऱ्या दुचाकी चालकांची संख्या वाढू लागली. अगदी काही मिनिटांतच लोहारा, मकरधोकडा आणि उमरेड परिसरात झाडावर बसलेल्या अस्वलाची बातमी पोहोचली. लागलीच घटनास्थही शेकडो दुचाकी, चारचाकीने लोकांची गर्दी उसळू लागली. या दरम्यान नागरिकांचा घोळका आणि गोंगाट चांगलाच दिसून येत होता. रात्री २ वाजतानंतर गर्दी कमी झाल्यानंतर अस्वल सुरक्षित ठिकाणी परत गेले. शुक्रवारी सकाळच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी परिसर पिंजून काढला, अस्वल सुरक्षित असल्याची खात्री केली.