शंकरनगर, बर्डीतील रस्त्यावरील गर्दी ओसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:10 AM2021-02-28T04:10:39+5:302021-02-28T04:10:39+5:30
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेचे संकट परतवून लावण्यासाठी प्रशासनाने नागपुरात दोन दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला. या काळात ...
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेचे संकट परतवून लावण्यासाठी प्रशासनाने नागपुरात दोन दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला. या काळात शहरातील बहुतेक रस्ते ओस पडलेले दिसले. प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीतील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतेक सर्व दुकाने बंद होती.
सीताबर्डी, रामदासपेठ आणि धंतोली हा एरवी गजबजलेला परिसर असतो. या परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्णालये असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी असते. नाश्ता, चहा, हॉटेल्स, खानावळदेखील दिवसभर माणसाच्या गर्दीने फुललेल्या असतात. परंतु शनिवारी हा परिसर गर्दीविना जाणवला. सीताबर्डी परिसरातील एरवी गजबजलेल्या गल्ल्याही आज व्यापारपेठ बंद असल्याने सुनसान जाणवत होत्या.
शहरातील रस्ते ओस पडले नसले तरी गर्दी मात्र ओसरलेली जाणवली. चारचाकी, दुचाकी वाहने तसेच ऑटोसेवाही तुरळक प्रमाणात सुरू होती.
गोकुळपेठ परिसरात शनिवारी भाजीबाजार भरतो. परिसरातील बहुतेक किराणा दुकानेही सुरू दिसली. मात्र बाजारात म्हणावी तशी गर्दी नव्हती. लॉकडाऊनमुळे ग्राहक नसणारे हे आधीच लक्षात आल्याने अनेक दुकानदारांनी भाजीपालाचा साठा मर्यादित ठेवला होता. त्यामुळे अनेक भाज्यांचे भाव वाढलेले दिसले. खामला परिसरातील भाजीबाजारात सकाळी बऱ्यापैकी गर्दी होती. दुपारनंतर मात्र ती ओसरली. विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा जाणवली. या परिसरातील बहुतेक दुकाने आणि बाजारपेठ बंद होती. किराणा दुकाने, दूध केंद्र, पेट्रोल पंप, औषध विक्रीची दुकाने मात्र सुरू होती. अलंकार टॉकीजचा परिसरदेखील प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देताना दिसला. धरमपेठ, शंकरनगर, छत्रपती चौक, अजनी चौक परिसर आदी भागातही दुकानदारांनी आणि नागिरकांनी लॉकडाऊनला सहकार्य केलेले दिसले.
आयटी पार्क परिसरातील मार्गावर एरवी दिसणारी नाश्ता, चहाची दुकानेही आज बंद होती. युवक, विद्यार्थी आणि नागरिकांच्या गर्दीने हा मार्ग सदैव बहरलेला असतो. मात्र शनिवारी सर्वकाही बंद होते.
लॉकडाऊनमुळे मार्गावर गर्दी कमी असल्याने अनेक ठिकाणच्या मेट्रोच्या कामाला शनिवारी वेग आलेला दिसला. अंबाझरीजवळील मेट्रोचे काम वेगाने सुरू असलेले दिसले.