जनसेवेसाठी सीआरपीफ सज्ज ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:07 AM2021-06-29T04:07:48+5:302021-06-29T04:07:48+5:30
नागपूर : केंद्र सरकारकडून नागरी उपाययोजनेसाठी सीआरपीएफला निधी मिळतो. या निधीचा वापर करून नागरिकांसाठी सोयीसुविधा उभारल्या जात आहेत. सीएरपीएफच्या ...
नागपूर : केंद्र सरकारकडून नागरी उपाययोजनेसाठी सीआरपीएफला निधी मिळतो. या निधीचा वापर करून नागरिकांसाठी सोयीसुविधा उभारल्या जात आहेत. सीएरपीएफच्या कम्पोजिट हॉस्पिटलची (सीएच) संख्या वाढविण्यात आली आहे. हॉस्पिटल अपग्रेड करण्यात येत आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळतील. जनसेवेसाठी सीआरपीएफ सज्ज आहे, असे महाराष्ट्र, गोवा व गुजरातच्या (पश्चिम सेक्टर) केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) पोलीस महानिरीक्षक रणदीप दत्ता यांनी सांगितले.
रणदीप दत्ता यांनी हिंगणा येथील ग्रुप केंद्राचे सोमवारी निरीक्षण केले. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रासाठी नवीन भरती करण्यात आलेल्या ४१८ जवानांना उत्कृष्ट प्रशिक्षण देणे आमची प्राथमिकता आहे. ग्रुप केंद्राद्वारे यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर प्रदान करण्यात आले. केंद्राच्या परिसरात त्यांनी वृक्षारोपण केले. त्यांच्या हस्ते प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन झाले. त्यांनी जवानांशी संवाद साधत मनोबल वाढविले. त्यानंतर ग्रुप केंद्राअंतर्गत को-ऑपरेटिव्ह शॉप, हॉट स्प्रिंग मेस, खेलगाव आदी कार्यालयांचे निरीक्षण केले.
यावेळी त्यांच्यासोबत नागपूर ग्रुप केंद्राचे डीआयजी प्रशांत जांभुळकर, एसटीसी कमांडेंट सुभाषचंद्र, डीआयजी लोकेंद्र सिंह, संतोषकुमार मिश्रा, कमांडेंट करुणा रॉय, उप कमांडेंट विजय सिंह, सहायक कमांडेंट राहुल भशारकर, संकल्प मिश्रा, जनसंपर्क अधिकारी प्रदीप द्विवेदी, कंपोजिट रुग्णालय व २१३ महिला बटालियनचे अन्य अधिकारी उपस्थित होते. नागपूर केंद्राचे निरीक्षण केल्यानंतर ते गडचिरोलीकडे रवाना झाले.