नागपुरात रेड झोनमध्ये सीआरपीएफ महिला कंपनीने सांभाळला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 09:51 PM2020-05-23T21:51:20+5:302020-05-23T21:56:10+5:30
केंद्रीय राखीव पोलिस दलाची (सीआरपीएफ) महिला कंपनी शनिवारी नागपुरात दाखल झाली. ८४ अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ असलेल्या या कंपनीने नागपुरातील रेड झोनमध्ये आजपासून मोर्चा सांभाळला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय राखीव पोलिस दलाची (सीआरपीएफ) महिला कंपनी शनिवारी नागपुरात दाखल झाली. ८४ अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ असलेल्या या कंपनीने नागपुरातील रेड झोनमध्ये आजपासून मोर्चा सांभाळला आहे.
शहरातील शांतिनगर, सतरंजीपुरा, मोमिनपुरासह अनेक भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने अनेक भाग सील करण्यात आले आहेत. तेथे मोठ्या संख्येत पोलिस तैनात करूनही पोलिसांना त्या भागातील नागरिक जुमानत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे येथे निमलष्करी दलाची तुकडी नेमण्याचा निर्णय स्थानिक अधिकाऱ्यांनी घेतला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय राखीव पोलिस दलाची (सीआरपीएफ) कंपनी शनिवारी शहरात दाखल झाली. अधिकाऱ्यांनी ठरवून दिल्याप्रमाणे परिमंडळ दोन, तीन, चार आणि पाचमधील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत या कंपनीला वेगवेगळ्या संख्येत तैनात करण्यात आले. कोणत्या परिमंडळात किती संख्याबळ तैनात झाले, त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
परिमंडळ दोन : सदर आणि अंबाझरी पोलीस स्टेशन. २ सेक्शन (प्रत्येकी १ अधिकारी, ७ कर्मचारी).
परिमंडळ तीन : शांतिनगर पोलिस स्टेशन. १ प्लाटून ( २ अधिकारी, १५ कर्मचारी).
परिमंडळ चार : अजनी आणि हुडकेश्वर पोलीस स्टेशन. १ प्लाटून (२ अधिकारी, १५ कर्मचारी)
परिमंडळ पाच : यशोधरा पोलीस स्टेशन. १ सेक्शन (१ अधिकारी, ७ कर्मचारी).
सर्वच्या सर्व महिला
स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार सीआरपीएफच्या या बटालियनमध्ये सर्वच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी महिलाच आहेत.