सीआरपीएफचे डीआयजी लाठकर यांना राष्ट्रपतींचे पोलीस मेडल

By admin | Published: August 15, 2015 03:03 AM2015-08-15T03:03:27+5:302015-08-15T03:03:27+5:30

गडचिरोली-गोंदियातील नक्षल चळवळीचे कंबरडे मोडणारे केंद्रीय सुरक्षा दलाचे उपमहानिरीक्षक संजय लाठकर यांच्यासह ...

CRPF's DIG Lathkar gets the President's Police Medal | सीआरपीएफचे डीआयजी लाठकर यांना राष्ट्रपतींचे पोलीस मेडल

सीआरपीएफचे डीआयजी लाठकर यांना राष्ट्रपतींचे पोलीस मेडल

Next

नागपूर : गडचिरोली-गोंदियातील नक्षल चळवळीचे कंबरडे मोडणारे केंद्रीय सुरक्षा दलाचे उपमहानिरीक्षक संजय लाठकर यांच्यासह नागपुरातील चार आणि ग्रामीणमधील एका पोलीस अधिकाऱ्याला स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘पोलीस मेडल‘ जाहीर करण्यात आले. सुरक्षा दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल संबंधितांना राष्ट्रपतींद्वारे स्वातंत्र्यदिनी पोलीस पदक बहाल करण्यात येतात.
आयपीएस बिहार कॅडर असलेले संजय लाठकर मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. उच्च विद्या विभूषित लाठकर यांनी प्रारंभी बीई सिव्हील केल्यानंतर आयआयटी पवईतून एमटेक (एन्व्हायर्नमेंट इंजिनिअरिंग) पूर्ण केले. त्यानंतर १९९५ ला ते सरळ सेवा भरतीने भारतीय पोलीस दलात रुजू झाले. रणवीर सेना आणि नक्षलवाद्यांचा गड मानला जाणाऱ्या बिहारमधील भोजपूर जिल्ह्यात त्यांना पहिली नियुक्ती मिळाली. त्यांंनी येथे दोन वर्षात अनेक धाडसी कारवाया करून रणवीर सेना आणि नक्षलवाद्यांची दाणादाण उडवली. परिणामी त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी दोनवेळा प्राणघातक हल्ले चढवले. एका वेळच्या हल्ल्यात लाठकर यांना मोठ्या संख्येत नक्षलवाद्यांनी गराडा घातला होता. अशा वेळी जीवाची पर्वा न करता लाठकर यांनी नक्षलवाद्यांशी आमनेसामने लढत देऊन दोन नक्षल्यांना कंठस्नान घातले तर, इतरांना पळून जाण्यास बाध्य केले. या जिगरबाज कामगिरीमुळे लाठकर यांना शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले होते.
लाठकर सध्या नागपूर आणि गडचिरोली विभागाचे सीआरपीएफचे डीआयजी म्हणून प्रतिनियुक्तीवर सेवा देत असून, त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच गडचिरोलीतील नक्षलवादी कारवायांना लगाम बसलेला आहे. २० वर्षांच्या सेवेत त्यांना प्रशंसनीय सेवेबद्दल दोन वेळा शौर्यपदक, म. गांधी शांतता पुरस्कार आणि ५५ वेळा प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत सीआरपीएफने नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात बजावलेली उल्लेखनीय कामगिरी लक्षात घेता लाठकर यांना राष्ट्रपतींद्वारे देण्यात येणारे ‘पोलीस पदक‘ जाहीर करण्यात आले. एकीकडे असे कर्तव्यकठोर असलेले लाठकर सीआरपीएफच्या जवानांसाठी मायाळू पालक म्हणूनही ओळखले जातात. (प्रतिनिधी)
यांनाही मिळाले पदकं
सीबीआयच्या स्थानिक युनिटमधील डीवायएसपी त्रियाग रंजन श्रीधरन्, शहर पोलीस दलातील विशेष शाखेचे सहायक उपनिरीक्षक ईश्वर किनकर, खापरखेडा (नागपूर ग्रामीण) पोलीस ठाण्यातील सहायक उपनिरीक्षक रामआसरे मिश्रा आणि सीआरपीएफ २१३ लेडीज बटालियनच्या सहायक उपनिरीक्षक कल्पना शहा यांनासुद्धा उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस पदक जाहीर झाले आहे.

Web Title: CRPF's DIG Lathkar gets the President's Police Medal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.