क्रूरकर्मा अमित गांधीला भोगावा लागेल ३० वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 03:54 PM2018-05-14T15:54:02+5:302018-05-14T15:54:14+5:30

ओळखीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्यानंतर तिला दगडाने ठेचून निर्दयीपणे ठार मारणारा क्रूरकर्मा अमित गजानन गांधी याला जन्मठेपेच्या शिक्षेंतर्गत ३० वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे. राज्य सरकारने गेल्या २१ एप्रिल रोजी हा निर्णय घेतला असून, त्याची माहिती नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली.

Cruel Amit Gandhi will have to imprisonment 30 years in Nagpur Jail | क्रूरकर्मा अमित गांधीला भोगावा लागेल ३० वर्षांचा कारावास

क्रूरकर्मा अमित गांधीला भोगावा लागेल ३० वर्षांचा कारावास

Next
ठळक मुद्देराज्य सरकारचा निर्णय : अल्पवयीन मुलीचा बलात्कार व खून करणारा गुन्हेगार

राकेश घानोडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ओळखीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्यानंतर तिला दगडाने ठेचून निर्दयीपणे ठार मारणारा क्रूरकर्मा अमित गजानन गांधी याला जन्मठेपेच्या शिक्षेंतर्गत ३० वर्षांचा कारावास भोगावा लागणार आहे. राज्य सरकारने गेल्या २१ एप्रिल रोजी हा निर्णय घेतला असून, त्याची माहिती नुकतीच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली.
फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ४३२ मध्ये बंदिवानांची शिक्षा स्थगित किंवा माफ करण्याची तरतूद आहे. त्याअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात १४ वर्षे कारावास भोगलेल्या कैद्याला मुक्त करण्याचा आदेश दिला होता. अमित १६ वर्षांपेक्षा अधिक काळापासून कारागृहात आहे. त्यामुळे त्याला कायमचे सोडण्यात यावे, यासाठी त्याच्या वडिलांनी १२ एप्रिल २०१६ रोजी राज्य सरकारला अर्ज सादर केला होता. त्यावर अनेक महिने विचार करण्यात आला नाही. परिणामी, अमितने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सरकारला यासंदर्भात आदेश देण्याची विनंती केली होती. पात्र बंदिवानांना कायद्यातील तरतुदीनुसार कारागृहातून मुक्त करण्यासंदर्भात सरकारची भूमिका उदासीन आहे. त्यामुळे बंदिवानांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे, असे त्याने याचिकेत म्हटले होते. न्यायालयाने संबंधित अर्ज विचारात घेण्याचा आदेश दिल्यानंतर, सरकारने हा निर्णय घेतला व त्याची प्रत न्यायालयात सादर केली. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता, अमितला कोणताही दिलासा देण्यास नकार देऊन त्याची याचिका फेटाळून लावली. यापुढे अमित सरकारच्या निर्णयाच्या वैधतेला आव्हान देण्यास मोकळा असला तरी, सध्याच्या परिस्थितीत त्याला ३० वर्षांचा कारावास भोगावा लागेल, ही बाब स्पष्ट झाली आहे.
अमितचे मुद्दे ठरले निष्प्रभ
अमितने कायद्यातील तरतुदी, चांगले वर्तन, शिक्षणातील प्रगती इत्यादी मुद्यांच्या आधारावर दिलासा मिळण्याची विनंती केली होती. आतापर्यंत कारागृहात चांगले वर्तन ठेवले असून, त्यासाठी पुरस्कार मिळाला आहे. कारागृहातील पॉवरलूम विभागप्रमुखाची जबाबदारी गेल्या १४ वर्षांपासून यशस्वीपणे पार पाडीत आहे. कारागृहात राहून बी.ए. व एम. ए. (समाजशास्त्र) पदवी मिळविली. मनाचे विचार व्यक्त करणे, वादविवाद यासह विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन पुरस्कार प्राप्त केले. २०१० मध्ये एलएलबी प्रथम सेमिस्टरची परीक्षा दिली. आपण गरीब कुटुंबातील असून, २८ मार्च २००१ पासून कारागृहात आहे. जन्मठेपेच्या शिक्षेमध्ये जेवढा किमान कारावास भोगणे आवश्यक असते, त्यापेक्षा जास्त कारावास भोगला आहे. त्यामुळे, २०१४ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आपण
कारागृहातून कायमचे मुक्त होण्यास पात्र आहोत, असे मुद्दे अमितने मांडले होते. परंतु, अत्यंत क्रूरतापूर्ण गुन्हा केल्यामुळे या मुद्यांची मदत त्याला मिळू शकली नाही.
असे आहे अमितचे प्रकरण
जुलै-१९९८ मध्ये अमितने ओळखीच्या अल्पवयीन मुलीला तिच्या वडिलाचा अपघात झाल्याचे खोटे सांगून तिला सायकलने कोराडीतील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरामागील निर्जन भागात नेले. घटनेपूर्वी त्या मुलीच्या व अमितच्या कुटुंबाचे चांगले संबंध होते. त्यामुळे अमितच्या मनातील कट मुलीच्या लक्षात आला नव्हता. ती विश्वासाने अमितसोबत गेली होती. अमितने ओळखी व विश्वासाचा फायदा घेतला. त्या निर्जन ठिकाणी अमितने सुरुवातीला मुलीवर पाशवी बलात्कार केला. त्यानंतर मुलीचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला. घटनेच्या दुसºया दिवशी गुराख्याला मुलीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून अमितला अटक केली. ३० आॅक्टोबर २००२ रोजी सत्र न्यायालयाने अमितला फाशीची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. परिणामी, अमितने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने अमितचे कमी वय लक्षात घेता, फाशीची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तित केली.

 

Web Title: Cruel Amit Gandhi will have to imprisonment 30 years in Nagpur Jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.