फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर क्रूरकर्मा थरारला... न्यायालयाला म्हणाला ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2023 07:24 PM2023-04-15T19:24:54+5:302023-04-15T19:25:38+5:30

Nagpur News मृत्यूदंडाची अर्थात् फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पाच जणांची हत्या करणारा विवेक गुलाबराव पालटकर (वय ४२)नामक क्रूरकर्मा घाबरला. त्याने जीवाला भीती असल्याची बतावणी करून नागपुरातून दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी आपल्याला हलवा, अशी विणवणी कोर्टात केली.

Cruel Karma was shocked after being sentenced to death... said in the court... | फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर क्रूरकर्मा थरारला... न्यायालयाला म्हणाला ...

फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर क्रूरकर्मा थरारला... न्यायालयाला म्हणाला ...

googlenewsNext


नरेश डोंगरे 
नागपूर : मृत्यूची भीती चांगल्या चांगल्यांना घाबरवते. अगदी क्राैर्याची सीमा गाठणाऱ्या क्रूरकर्म्यालाही कंप सुटतो अन् त्याचमुळे आपला जीव सुरक्षित राहावा म्हणून तो रडकुंडीला येऊन आर्जव करतो. येथील सत्र न्यायालयात आज असेच झाले. मृत्यूदंडाची अर्थात् फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर पाच जणांची हत्या करणारा विवेक गुलाबराव पालटकर (वय ४२)नामक क्रूरकर्मा असाच घाबरला. त्याने जीवाला भीती असल्याची बतावणी करून नागपुरातून दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी आपल्याला हलवा, अशी विणवणी कोर्टात केली.


मुळचा नवरगाव (माैदा, जि. नागपूर) येथील रहिवासी असलेल्या अविवेकी पालटकरने चारित्र्याच्या संशयावरून २०१४ मध्ये पत्नीची हत्या केली. तिला स्वत:च्या अंगणात गावकऱ्यांसमोर पेटवून दिले. त्याच्या या अमाणूष कृत्याबाबत न्यायालयाने त्याला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. मात्र, त्याची पाठराखण करून त्याला हरसंभव मदत करणारे त्याचे जावई कमलाकर पवनकर यांनी जामिनाची व्यवस्था करून त्याला कारागृहातून बाहेर आणले. त्याच्यासकट त्याचा पाच वर्षांचा मुलगा कृष्णा आणि मुलगी वैष्णवी यांना आपल्या घरात ठेवून त्यांची खाण्यापिण्याचीही व्यवस्था केली. या उपकाराची पालटकरने भयंकररित्या परतफेड केली.


११ जून २०१८ च्या पहाटे त्याने स्वत:चा निरागस मुलगा कृष्णा, आईसारखा सांभाळ करणारी मोठी बहिण अर्चना, मामा मामा करत अंगाखांद्यावर खेळणारी चिमुकली भाची वेदांती, चांगल्या वाईट कामात साथ देऊन वडिलांप्रमाणे जपणारे जावई कमलाकर अन् त्यांची वृद्ध आई मीराबाई या पाच जणांची सब्बलने हत्या केली. संपुर्ण घरात रक्ताचा सडा सांडविणारा हा क्रूरकर्मा तेथून आपल्या भाड्याच्या रूमवर गेला आणि घरात अघोरी पूजा करून तेथून तो पंजाबमध्ये पळून गेला. हे थरारक हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला लुधियानात जाऊन अटक केली. चाैकशीनंतर त्याला कारागृहात डांबण्यात आले. न्यायालयात त्याच्याविरुद्ध खटला चालविण्यात आला. शनिवारी, १५ एप्रिलला न्या. आर. एस. पावसकर यांनी क्रूरकर्मा पालटकरला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. त्यावर, पालटकरने अतिशय बेफिकिरीने न्यायालयाला विचारले, मृत्यूदंड म्हणजे १० वर्षांचा कारवास की २० वर्षांचा ?, त्याचा हा प्रश्न पाहून न्यायालयाने त्याला मृत्यूदंड म्हणजे मरेपर्यंत फाशीची शिक्षा, असे सांगितले. अर्थात मृत्यूची चाहूल लागताच क्रूरकर्मा पालटकर हादरला. त्याने सावध पवित्रा घेत 'नागपूरच्या कारागृहात आपल्या जीवाला धोका आहे. त्यामुळे येथून दुसऱ्या कोणत्याही कारागृहात आपल्याला हलवावे', असे तो म्हणाला. त्याचा तो धूर्तपणा उपस्थित सर्वांनाच अचंबित करणारा होता.

महिनाभरात चार जन्मठेप, एक फाशी
या प्रकरणात सरकारी वकिल म्हणून अॅड. अभय जिकार यांनी भक्कम पुराव्याच्या आधारे अत्यंत प्रभावी युक्तीवाद केला. एका पाठोपाठ अनेकांचे जीव घेत सुटलेला हा नराधम दयामाया दाखविण्यास पात्र नाही. त्याला फाशीसारखी कठोर शिक्षा दिली नाही तर ते समाजहिताचे ठरणार नाही, असेही न्यायालयात पटवून दिले. त्यानंतर फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. विशेष म्हणजे, गेल्या महिनाभराच्या कालावधीत अॅड. जिकार यांनी नरखेड, सावनेर, बुटीबोरी आणि नागपूर अशा चार ठिकाणच्या वेगवेगळ्या प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा करवून घेतली आहे.

आज न्याय मिळाला : केशव पवनकर
पाच वर्षे लागलीत मात्र न्यायालयाने आज आम्हाला न्याय दिला, अशी भावूक प्रतिक्रिया मृत पवनकर कुटुंबियांचे नातेवाईक केशव पवनकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. त्यांनी न्यायालयासह, सरकारी वकिल तसेच या प्रकरणात मदत करणाऱ्यांचे आभार मानले.

Web Title: Cruel Karma was shocked after being sentenced to death... said in the court...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.