वन्यजीव सप्ताहात वाघाच्या बछड्याची शिकार, दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 12:24 PM2021-10-08T12:24:15+5:302021-10-08T14:10:38+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील चिंचबोडीच्या जंगलात १० दिवसांच्या वाघाच्या बछड्याला निष्ठूरपणे ठार करणाऱ्या दोन आरोपींना वनविभागाच्या पथकाने पकडले आहे.

Cruelly killed a 10-day-old tiger calf | वन्यजीव सप्ताहात वाघाच्या बछड्याची शिकार, दोघांना अटक

वन्यजीव सप्ताहात वाघाच्या बछड्याची शिकार, दोघांना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देबुटीबोरी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील चिंचबोडीच्या जंगलात १० दिवसांच्या वाघाच्या बछड्याला निष्ठूरपणे ठार करणाऱ्या दोन आरोपींना वनविभागाच्या पथकाने पकडले आहे. बुटीबोरी पथकाने ही कारवाई केली असून या दोघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

लोमेश नानाजी दाबले (चिंचबोडी, ता. सावली) आणि कालिदास मारोती रायपुरे (मसाळा) अशी या आरोपींची नावे आहेत. वाघाच्या अवयवांच्या तस्करीचे प्रकरण सध्या बुटीबोरीचे पथक हाताळत आहे. मागील महिनाभरापासून या प्रकरणी तपास सुरू असून वाघाची हाडे, दात, चामडे, मिशी आदी वस्तू तस्करांकडून जप्त करण्यात आल्या असून आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या तपासातूनच वाघाच्या बछड्याची हत्या केल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती.

वन्यजिवांचे संरक्षण-संवर्धन करण्याच्या दृष्टिने देशभरात २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान वनजीव सप्ताह साजरा केला जातो. मात्र, तरीही प्राण्यांची तस्करी, हत्येसारखे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. या आरोपींनी ५ महिन्यांपूर्वीच १० दिवसांच्या वाघाच्या बछड्याची शिकार केली होती. एवढ्या दिवसांनंतरही त्याचे शव त्यांनी सुरक्षितपणे जपून ठेवले होते. मे-२०२१ मध्ये त्यांनी सावली तालुक्यातील चिचबोडीच्या जंगलात ही शिकार केली होती. तेव्हापासून त्याच्या विक्रीसाठी हे आरोपी शोध घेत होते.   

आरोपी सक्रिय झाल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे मागील १० दिवसांपासून वनविभागाचे पथक त्यांच्या मागावर होते. दरम्यान, बुधवारी यातील एक आरोपी लोमेश दाबले हा एमआयडीसी रोडवर वाघाचे अवयव घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. मात्र याच दरम्यान, दुसरा आरोपी रायपुरे याने ग्राहकाला चंद्रपुरातील पडोली येथे अवयवांच्या विक्रीसाठी बोलावले. यामुळे चंद्रपुरातील शिकार प्रतिबंधक पथकाचे फॉरेस्टर अरुण गादेवार यांना तातडीने सूचना देण्यात आली.

यानंतर सापळा रचून बुटीबोरी पथकाने चंद्रपूर पथकाच्या मदतीने दोन्ही आरोपींना पकडले. उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा, एसीएफ एन.जी. चांदेवार यांच्या मार्गदर्शनाखाली बुटीबोरी वनपरिक्षेत्राधिकारी लहू ठोकळ आणि पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Cruelly killed a 10-day-old tiger calf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.