मानहानीजनक आरोप करणे क्रूरता
By admin | Published: August 18, 2015 03:23 AM2015-08-18T03:23:42+5:302015-08-18T03:23:42+5:30
पत्नीने आधारहीन, मानहानीजनक व अविवेकी आरोप करणे पतीसोबतची क्रूरता ठरते, असे निरीक्षण मुंबई उच्च
नागपूर : पत्नीने आधारहीन, मानहानीजनक व अविवेकी आरोप करणे पतीसोबतची क्रूरता ठरते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले आहे. तसेच, पत्नीच्या क्रूरतेच्या आधारावर पतीला घटस्फोट मंजूर करण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे.
या प्रकरणातील घटस्फोटित दाम्पत्य प्रांजली व प्रशांत (काल्पनिक नावे) यांचे २७ मार्च २००८ रोजी नागपुरात लग्न झाले होते. प्रांजली भंडारा तर प्रशांत नागपूर येथील रहिवासी आहे. प्रशांत हा प्रांजलीला प्रेमाने वागवत होता. तिला चित्रपट दाखविण्यासाठी घेऊन जात होता. हॉटेलमध्ये नेत होता. प्रशांतने प्रांजलीच्या वाढदिवसाला केक आणला होता. तिला घड्याळ भेट दिली होती, अशी तथ्ये उच्च न्यायालयाने उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर नमूद करून, असे असतानाही प्रांजलीने पतीसह सासरच्या सदस्यांविरुद्ध धक्कादायक आरोप करणे क्रूरता असल्याचे मत व्यक्त केले आहे.
प्रांजली लग्नानंतर काही दिवसांतच क्रूरतेने वागायला लागली होती. ती अनेकदा भोजन करीत नव्हती व कोणालाही न सांगता माहेरी निघून जात होती. समजावूनही ऐकत नव्हती. आजाराचे कारण सांगून ती नेहमीच झोपून राहायची. घरातील कामे करणे तिला आवडत नव्हते. ती छोट्या छोट्या गोष्टीला ताणून धरत होती. माहेरी फोन करून सासरच्या सदस्यांची तक्रार करीत होती. २१ फेब्रुवारी २००९ रोजी ती माहेरी निघून गेली. २३ जून रोजी परत येऊन लग्नात दिलेल्या वस्तू परत मागायला लागली. ती सासरच्या सदस्यांना खोट्या फौजदारी प्रकरणात फसविण्याची धमकी देत होती. तिने हुंड्यासाठी छळाची तक्रारही नोंदविली होती. सासरच्या सदस्यांनी बळजबरीने गर्भपात करायला लावला, असा तिचा आरोप होता.
प्रशांतने प्रांजलीच्या वागणुकीला कंटाळून कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. १२ आॅगस्ट २०१३ रोजी नागपूर कौटुंबिक न्यायालयाने प्रशांतला प्रांजलीच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मंजूर केला होता. या निर्णयाविरुद्ध प्रांजलीने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अनंत बदर यांनी प्रांजलीचे अपील खारीज करून कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
प्रांजलीने कौटुंबिक न्यायालयात लेखी बयान सादर करून सर्व आरोप फेटाळून लावले होते. परंतु तिला स्वत:ची बाजू पुराव्यांसह सिद्ध करता आली नाही.(प्रतिनिधी)