‘लिव्ह इन’मधून क्रूरता, प्रेयसीच्या चार वर्षीय चिमुकलाच्या सर्वांगाला सिगारेटचे चटके
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 11:00 AM2023-09-12T11:00:01+5:302023-09-12T11:02:41+5:30
आरोपीविरोधात गुन्हा दाखल : वडिलांचे छत्र हरविलेल्या चिमुकल्यांचा छळ
नागपूर : एका १० वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार करत छळ केल्याचे प्रकरण ताजेच असताना आता एका चार वर्षीय मुलाला क्रूरतापूर्वक सिगारेटचे चटके दिल्याची बाब समोर आली आहे. आत्महत्या करत जीव देणाऱ्या वडिलांचे छत्र गमविल्यानंतर चिमुकल्यांच्या आईसोबत ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या आरोपीने हा प्रकार केला आहे. वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संकेत रमेश उत्तरवार (३२, वडधामना) असे आरोपीचे नाव आहे. तो काही काळाअगोदर पती गमावलेल्या एका महिलेसोबत वडधामना परिसरातच राहतो. त्या महिलेला सहा वर्ष व चार वर्षांचे वय असलेली दोन मुले आहेत. मुले अजाणत्या वयाची असल्याने ते त्याला ‘पप्पा’ असेच हाक मारतात. मात्र दोन्ही मुले माझी नाहीत, असे म्हणत संकेत नेहमी त्यांचा छळ करायचा व मारायचा. त्यातूनच त्याने काही दिवसांअगोदर चार वर्षांच्या चिमुकल्याला लहानसहान गोष्टींवरून चटके देण्यास सुरुवात केली.
तो सिगारेट किंवा इतर गोष्टीने चटके द्यायचा. त्यामुळे मुले नेहमी दहशतीत राहायची. इतके होऊनदेखील तो मुलाला उपचारदेखील देत नव्हता. आश्चर्याची बाब म्हणजे आईकडूनदेखील फारसा विरोध होत नव्हता. या मुलांच्या दिवंगत वडिलांच्या आईला ही बाब एका ओळखीच्या व्यक्तीकडून कळाली व त्यानंतर तिने जाऊन खातरजमा केली. तिने स्वत:च्या डोळ्यांनी हा प्रकार पाहिल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने थेट वाडी पोलिस ठाणे गाठले व आरोपीविरोधात तक्रार केली.
पोलिसांनी संकेतविरोधात अल्पवयीन न्याय कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी लगेच शोधमोहीम राबविली व संकेतला अटक केली आहे. तो एमआयडीसीतील एका कंपनीत काम करतो व तो लिव्ह इनमध्येच राहत होता, अशी माहिती वाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायनवार यांनी दिली.
असा उघडकीस आला प्रकार
चार वर्षीय मुलाच्या आईवडिलांचे सात वर्षांअगोदर लग्न झाले होते. दोन मुले झाल्यानंतर फिर्यादी महिलेच्या मुलाने गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर तिची सून दोन मुलांना घेऊन तिच्या आईच्या घराजवळ राहायला गेली. संकेत तिच्यासोबत राहत होता. त्यांनी अधिकृतपणे लग्न केले की नाही याबाबत कुणालाही नेमकी कल्पना नाही. दरम्यान, मुलांच्या आजीला एका नातेवाइकाने फोन करून चार वर्षीय मुलाच्या चेहरा, पाठीवर व पोटावर जळाल्याचे मोठे डाग दिसत असल्याचे सांगितले. आजीने त्यांचे घर गाठले व नातवाला जवळ घेऊन विचारणा केली. तो सांगण्यास नकारच देत होता. त्याला लाडाने विचारले असता रडत रडत त्याने घडलेला प्रकार सांगितला.