उपराजधानीतील गुन्हेगारी ठेचून काढा : पोलीस आयुक्तांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 10:37 PM2019-06-20T22:37:23+5:302019-06-20T22:39:09+5:30
उपराजधानीतील गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी कठोर उपाययोजना राबवा आणि विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन कम्युनिटी पुलिसिंग राबवा, असे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाला दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी कठोर उपाययोजना राबवा आणि विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन कम्युनिटी पुलिसिंग राबवा, असे निर्देश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलाला दिले आहेत. अवैध धंदे नष्ट करून गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी काय करायचे तसेच नागपूरकरांचा विश्वास जिंकण्यासाठी कोणते उपक्रम राबवायचे, यासाठी पोलीस आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना वेळोेवळी सूचना निर्देश दिले आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शहरात हत्यासत्र सुरू झाल्यासारखे झाले आहे. प्राणघातक हल्ले आणि चोऱ्या-घरफोडीचे गुन्हेही सारखे वाढतच आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी अधिनस्थ अधिकाऱ्यांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, गुन्हेगारी नियंत्रणासाठी कठोर उपाययोजना अमलात आणण्याचेही आदेश दिले आहेत. विशेष म्हणजे, पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेल्या डॉ. उपाध्याय यांनी आतापर्यंत १० वेगवेगळे उपक्रम राबविण्याचे आदेश काढले होते. त्याची आठवण करून देत तसे बुकलेटच पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहे.
अवैध धंदे हे गुन्हेगारांना रसद पुरविण्याचे काम करतात. गुन्हेगारांचे कंबरडे मोडायचे असेल तर अवैध धंद्यांचे उच्चाटन महत्त्वाचे ठरते. त्यामुळे डॉ. उपाध्याय यांनी शहरातील ठाणेदारांना आपापल्या ठाण्याच्या हद्दीत ऑपरेशन वाईप आऊट सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अवघ्या सात दिवसांत शहरातील ६२४ दारू, जुगाराचे अड्डे बंद करण्यात आले. त्यानंतर गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी ऑपरेशन क्रॅक डाऊन सुरू करण्यात आले. त्यानुसार, अवघ्या सात दिवसांत शहरातील १६,३७७ गुन्हेगारांचा रेकॉर्ड तपासून त्यातील ४,०२९ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
तडीपारीची कारवाई करूनही अनेक कुख्यात गुन्हेगार शहरातच राहतात. त्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी विशेष तपास पथक ‘हिट स्क्वॉड’ तयार करण्यात आले. त्यानुसार १४५ तडीपार गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली.
गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांनी वाममार्गावर जाऊ नये, त्यांचे योग्य समुपदेशन व्हावे म्हणून केअर युनिट सुरू करण्यात आले. गुन्हेगारीच्या दलदलीतून बालगुन्हेगारांना बाहेर काढून त्यांना परत समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले.
विद्यार्थीदशेतील मुलांना पोलिसांबाबत आपुलकी वाटावी म्हणून पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी छात्र पोलीस ही संकल्पना राबविणे सुरू केले आहे. आजूबाजूला काही वाईट होताना दिसल्यास काय करावे, समाजाला सुरक्षित कसे ठेवायचे, याबाबत शाळा, महाविद्यालयात छात्र पोलीस हा उपक्रम राबविला जात आहे.
अवैध धंदे मोडून काढण्याची आणि गुन्हेगारांना वठणीवर आणण्याची पोलिसांमध्ये स्पर्धा लागावी म्हणून महिन्याचे मानकरी हा उपक्रम सुरू करण्यात आला. यात प्रत्येक महिन्यात चांगली कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
पोलिसांकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठीही डॉ. उपाध्याय यांनी नागरिकांच्या सोबत दिवाळी मिलन, कोजागिरी, मकरसंक्रांती आणि ईद मिलन(इफ्तार पार्टी)सारखे उपक्रम राबविणे सुरू केले आहे.
एकीकडे शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्त हे सर्व उपक्रम राबवीत असताना शहरातील काही पोलीस ठाण्यातील मंडळी अवैध धंदे करणाऱ्यांना प्रोत्साहित करीत आहेत. त्यातून गुन्हेगारांचे वाद होतात आणि नंतर हत्या, हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे घडतात. विजय मोहोडची हत्या त्यातीलच एक प्रकार आहे. तो लक्षात आल्याने पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत चांगलेच खडसावले आहे. शहरात गुन्हेगारी फोफावणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या, अवैध धंदे बंद करा आणि अवैध धंदेवाल्यांशी मैत्री ठेवू नका अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही आयुक्तांनी दिला आहे. गुन्हेगारीच्या उच्चाटनासाठी काय करायचे, ते लक्षात राहावे म्हणून आयुक्तालयातून एक बुकलेटच पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
नागपूर शहर पोलीस राज्यातील मॉडेल ठरावे, असे प्रयत्न आहेत. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाला छेद लावू पाहणाऱ्या पोलिसांची गय केली जाणार नाही. गंभीर गुन्हा घडल्यास त्या पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला यापुढे जाब विचारला जाईल. समाधानकारक माहिती मिळाली नाही तर संबंधिताची चौकशी करून कारवाई केली जाईल.
डॉ. भूषणकुमार उपाध्याय
पोलीस आयुक्त, नागपूर.