भंडाऱ्यातील मातांचा आक्रोश सातासमुद्रापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:16 AM2021-01-13T04:16:06+5:302021-01-13T04:16:06+5:30
योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने ...
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने देशभरातील समाजमन हेलावले. ‘टीआरपी’च्या ‘रेस’मध्ये धावणाऱ्या काही भारतीय वाहिन्यांकडून या घटनेवर फारसे ‘डिबेट’ झाले नाही. मात्र सातासमुद्रापलीकडील प्रसारमाध्यमांनी मात्र या घटनेची दखल घेतली अन् दहाही मातांचा आक्रोश आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला.
अगदी कुणाचेही मन गलबलून येईल अशी घटना भंडाऱ्यात घडली. ‘लोकमत’ने सर्वात अगोदर ही बातमी ‘ब्रेक’ केल्यानंतर देशभरातील माध्यमांचे लक्ष या घटनेकडे केंद्रित झाले. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनीदेखील याचे तातडीने वृत्तांकन केले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध माध्यमांनी या घटनेची दखल घेतली. मुद्रित, टेलिव्हिजन व ‘डिजिटल’ माध्यमांमध्ये या विदारक घटनेवर प्रकाश टाकण्यात आला. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांमुळे अनेक देशातील स्थानिक वर्तमानपत्र व वाहिन्यांमध्येदेखील या घटनेचे वृत्तांकन झाले. यात अमेरिका, फ्रान्स, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, सौदी अरब यांचा समावेश आहे. याशिवाय पाकिस्तान व चीनमधील माध्यमांनीदेखील याची दखल घेतली.
भारतातील श्रीमंत राज्यातील प्रकार
विविध वृत्तसंस्था व प्रसारमाध्यमांमध्ये भंडाऱ्याचे नाव ठळकपणे आले. जगातील आघाडीच्या वृत्तसंस्थांपैकी एक असलेल्या ‘रॉयटर्स’ने तर भारतातील श्रीमंत राज्यामध्ये हा प्रकार झाल्याचे म्हणत महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेच्या कार्यप्रणालीवरच बोट ठेवले.
या प्रमुख वृत्तसंस्था व माध्यमांनी घेतली दखल
- रॉयटर्स (युनायटेड किंगडम)
- डेली मेल (युनायटेड किंगडम)
- एएफपी (फ्रान्स)
- फ्रान्स २४ (फ्रान्स)
- बीबीसी (युनायटेड किंगडम)
- सीएनएन (अमेरिका)
- द वेस्ट ऑस्ट्रेलियन (ऑस्ट्रेलिया)
-अरब न्यूज (सौदी अरब)
- द डॉन (पाकिस्तान)
- झिनुआ (चीन)
- व्हॉईस ऑफ अमेरिका (अमेरिका)