नागपूर विद्यापीठाला बजाज समुहाकडून ५ कोटीचा सीएसआर निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 09:49 PM2018-01-12T21:49:38+5:302018-01-12T21:54:42+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंबाझरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या प्रशासकीय भवनासाठी ५ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता शुक्रवारी बजाज उद्योग समुहाकडून प्राप्त झाला आहे. एका अनोपचारिक सोहळ्यात बजाज फायनान्सचे संचालक संजय भार्गव यांच्याहस्ते कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना धनादेश प्रदान करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अंबाझरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या प्रशासकीय भवनासाठी ५ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता शुक्रवारी बजाज उद्योग समुहाकडून प्राप्त झाला आहे. एका अनोपचारिक सोहळ्यात बजाज फायनान्सचे संचालक संजय भार्गव यांच्याहस्ते कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना धनादेश प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, वित्त व लेखा अधिकारी राजू हिवसे, परीक्षा व मुल्यमापन विभागाचे संचालक डॉ. नीरज खटी, प्राचार्य डॉ. नरेश खंडाईत, कार्यकारी अभियंता दत्तात्रय हरडे, उपकुलसचिव प्रदीप बिनीवाले, अर्चना भोयर, मनिष झोडपे, बी.एस. राठोड, माध्यम समन्वयक डॉ. श्याम धोंड उपस्थित होते. विद्यापीठाची सर्व प्रशासकीय कार्यालये सामावून घेणारी ४ माळ्याची भव्य इमारत वेगाने पुर्ण होत आहे. या इमारत परिसराला ‘जमनालाल बजाज प्रशासकीय परिसर’ असे नाव देण्यात आले आहे. इमारतीच्या बांधकामावर सुमारे ३० कोटीचा खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ५० टक्के निधी बजाज उद्योग समुहातर्फे सीएसआर अंतर्गत प्राप्त होणार आहे. यापूर्वी ५० लाख रुपयांचा आरंभनिधी समुहातर्फे प्राप्त झाला आहे. याप्रसंगी बजाज समुहाचे संजय भार्गव म्हणाले की, बजाज समुहाने शैक्षणिक बांधिलकी जपली आहे. आर्थक दुर्बलतेमुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुणे परिसरात १०० शाळा सुरू करण्यात येणार आहे. प्रसंगी कुलगुरू डॉ. काणे म्हणाले की, या इमारतीत सर्व प्रशासकीय विभाग एकत्रित येणार असून, अद्यावत सुविधांनी सुसज्ज राहणार आहेत. ही इमारत अत्याधुनिक व पर्यावरणपुरक राहणार आहे. शंभरीच्या उंबरठ्यावर असलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नव्या युगात प्रगतीची मोठी झेप घेईल, अशी अपेक्षा डॉ. काणे यांनी व्यक्त केली. विद्यापीठाच्या प्रगतीच्या वाटचालीत बजाज समुहाच्या अमुल्य योगदानाबद्दल कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम यांनी भार्गव यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. श्याम धोंड यांनी केले.