एक सीटी स्कॅन केवळ ४ ते ५ एक्स-रे समान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:08 AM2021-05-07T04:08:22+5:302021-05-07T04:08:22+5:30
मेहा शर्मा नागपूर : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक डॉ़ रणदीप गुलेरिया यांनी एक सीटी स्कॅन ...
मेहा शर्मा
नागपूर : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक डॉ़ रणदीप गुलेरिया यांनी एक सीटी स्कॅन ३०० ते ४०० एक्स-रे समान असल्याची माहिती देऊन सौम्य कोरोना असलेल्या रुग्णांना सीटी स्कॅन टाळण्याचा सल्ला दिला होता़ दि इंडियन रेडिओलॉजिकल अॅण्ड इमेजिंग असोसिएशनने डॉ़ गुलेरिया यांचा हा दावा अमान्य केला आहे़ सध्या उच्च व आधुनिक तंत्रज्ञानयुक्त उपकरणे उपलब्ध असल्यामुळे डॉ़ गुलेरिया यांचा दावा निरर्थक असल्याचे असोसिएशनने स्पष्ट केले आहे़ असोसिएशननुसार एक सीटी स्कॅन केवळ ४ ते ५ एक्स-रे समान आहे़
डॉ़ गुलेरिया यांनी दिलेली माहिती वर्तमान विज्ञानाशी सुसंगत नाही़ त्यांनी केलेल्या दाव्याएवढे रेडिएशन वाईट नाही़ सीटी स्कॅनमुळे कर्करोग होतो, असे म्हणणे अयोग्य आहे़ एचआर-सीटी काळाची गरज आहे़ सीटी स्कॅनमुळे रुग्णाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो याचे पुरावे उपलब्ध नाही, असे रेडिओलॉजिस्ट डॉ़ राजू खंडेलवाल यांनी सांगितले़
मेडिकलच्या रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉ़ आरती आनंद यांनी डॉ़ गुलेरिया यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असावा, असे मत व्यक्त केले़ सीटी स्कॅन खूप जास्त वाईट नाही़ एचआर-सीटी नेहमी करावे लागत नाही़ कोरोना रुग्णांनी पहिल्या पाच दिवसात एचआर-सीटी करू नये़ कोरोना लक्षणे असताना आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह आल्यास एचआर-सीटी तातडीने करावे़ दुसऱ्यांदा सीटी करणे परिस्थितीवर अवलंबून आहे, अशी माहिती त्यांनी दिली़
रेडिओलॉजिस्ट डॉ़ जितेंद्र साहू यांनीही डॉ़ गुलेरिया यांची माहिती चुकीची असल्याचे नमूद केले़ नवीन उपकरणांचे रेडिएशन कमी असते़ रुग्णाला एचआर-सीटी यंत्रात केवळ ३०-३५ सेकंद थांबावे लागते़ वर्तमान काळात रेडिएशन कमी होते़ फुफ्फुसाची अवस्था तपासण्यासाठी एचआर-सीटी करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले़
रेडिओलॉजिस्ट डॉ़ रवी राजदेव यांनी ३०-४० वर्षांपूर्वीची यंत्रे धोकादायक होती, याकडे लक्ष वेधले़ आता कमी रेडिएशनचे स्कॅनर वापरले जातात़ रेडिएशन रुग्णाच्या शारीरिक अवस्थेवर अवलंबून असते़ लठ्ठ रुग्णासाठी जास्त रेडिएशन वापरले जाते़ कमाल रेडिएशनमध्ये एक एचआर-सीटी ४ ते ६ एक्स-रे समान आहे़ एका सीटी स्कॅनमुळे कर्करोग होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले़