रेल्वेस्थानकावर अस्वच्छतेचा कळस ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:08 AM2021-01-25T04:08:22+5:302021-01-25T04:08:22+5:30
नागपूर : लॉकडाऊन संपल्यानंतर रेल्वेगाड्यांची संख्या वाढत आहे; परंतु रेल्वेस्थानकावरील सुविधांमध्ये वाढ होताना दिसत नाही. प्लॅटफार्म क्रमांक ८ वरील ...
नागपूर : लॉकडाऊन संपल्यानंतर रेल्वेगाड्यांची संख्या वाढत आहे; परंतु रेल्वेस्थानकावरील सुविधांमध्ये वाढ होताना दिसत नाही. प्लॅटफार्म क्रमांक ८ वरील शौचालयांना पाहून रेल्वे प्रशासन स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष करून केवळ रेल्वेगाड्या चालविण्यास प्राधान्य देत असल्याची खात्री पटत आहे. हीच अवस्था रेल्वेस्थानकावरील इतर शौचालयांची आहे. रेल्वे प्रशासन फूट ओव्हर ब्रीज धुण्यासाठी हजारो लिटर पाण्याचा वापर करीत आहे; परंतु प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असतानाही शौचालयांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
रेल्वे प्रशासनाने जून आणि जुलै महिन्यापासून विशेष रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू केली. प्लॅटफार्म क्रमांक ८ वरून रेल्वेगाड्यांची वाहतूक सुरू झाली. रेल्वेस्थानकावर प्रवासी येत असल्यामुळे शौचालयांच्या स्वच्छतेकडे लक्ष पुरविणे रेल्वे प्रशासनाचे कर्तव्य आहे; परंतु शौचालयांच्या बाजूनेही जाताना प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. शौचालयांमधील दुर्गंधी पाहून येथे अनेक दिवसांपासून स्वच्छता करण्यात आली नसल्याचे दिसून येते. कोरोनामुळे मोजक्याच रेल्वेगाड्या सुरू आहेत. प्रवाशांची संख्याही कमी आहे. अशा स्थितीत रेल्वेस्थानकावर स्वच्छता राहावयास हवी; परंतु रेल्वेस्थानकावरील परिस्थिती अगदी विपरीत आहे. प्लॅटफार्मवरील डस्टबीनमधील कचराही उचलून नेण्याची तसदी घेण्यात येत नसल्याची स्थिती आहे. प्लॅटफार्मवरही धूळ साचलेली दिसते. कोरोनाच्या काळात प्रवासी तपासणीसाठी दीड तास आधी रेल्वेस्थानकावर पोहोचत आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वेस्थानकावरील शौचालय तसेच प्लॅटफार्मवर स्वच्छता राखण्याची गरज आहे.
.........