राज्यातील ११ वनक्षेत्र संवर्धित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:27 AM2020-12-04T04:27:34+5:302020-12-04T04:27:34+5:30
नागपूर : राज्य वन्यजीव मंडळाची १५ वी बैठक शुक्रवारी दुपारी ४ वाजता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने होत आहे. ही ...
नागपूर : राज्य वन्यजीव मंडळाची १५ वी बैठक शुक्रवारी दुपारी ४ वाजता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पद्धतीने होत आहे. ही १५ वी बैठक असली तरी नव्या समितीची दुसरी बैठक आहे. यापूर्वी ७ ऑगस्टला पहिली बैठक झाली होती. या बैठकीतील अजेंड्यावर राज्यातील ११ वनक्षेत्रे संवर्धित करण्याचे प्रस्ताव आहेत.
वनक्षेत्रांच्या संवर्धन क्षेत्र म्हणून राखीव घोषित करण्याच्या प्रस्तावांमध्ये नागपूर जिल्ह्यातील मोगरकसा आणि मुनिया या दोन तर अमरावती जिल्ह्यातील महेंद्री या वनक्षेत्रांचा समावेश आहे. या सोबतच चांदगड संवर्धन क्षेत्र, गगनबावडा संवर्धन क्षेत्र, भुदरगड संवर्धन क्षेत्र, पन्हाळगड संवर्धन क्षेत्र, विशालगड संवर्धन क्षेत्र (तिन्ही कोल्हापूर), जोर-जांभळी संरक्षण क्षेत्र, मायनी संवर्धन क्षेत्र (सातारा), आंबोली-डोडामार्ग संवर्धन क्षेत्र (सिंधुदुर्ग) असे ११ प्रस्ताव असून त्यावर या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
या बैठकीत वन्यजीव संरक्षण आणि व्यवस्थापनातील अडचणींवरही चर्चा केली जाणार आहे. संरक्षण प्रकल्पांमध्ये विकास प्रकल्प राबविण्यासंदर्भातही चर्चा होणार असून नाशिक जिल्ह्यातील ममदापूर येथील पाणी साठवण टॅंक निर्मिती तसेच ममदापूर संवर्धन आरक्षणामधील वनजमिनीच्या विषयावरही चर्चा केली जाणार आहे.
...
मुनियाची ब्रिटिशकाळापासून नोंद
नागपूर जिल्ह्यातील प्रस्तावित मुनिया संवर्धन क्षेत्राची नोंद ब्रिटिशकाळापासूनच संरक्षित क्षेत्र अशी आहे. दक्षिण बुटीबोरी वनक्षेत्रात हे क्षेत्र असून या ठिकाणी मुनिया पक्षी मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचे नाव मुनिया असे पडले आहे. महत्त्वाचे म्हणजे या क्षेत्रात वाघही अधिक आहेत. तर, मोगरकसा हे क्षेत्र पवनीजवळ असून तिथेही वनसंपदा विपुल आहे.
...