नागपूरचे सांस्कृतिक वैभव : कालिदास महोत्सव २९ नोव्हेंबरपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 08:13 PM2019-10-26T20:13:40+5:302019-10-26T20:14:32+5:30
नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेला कालिदास समारोह यंदा २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेला कालिदास समारोह यंदा २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०१९ या कालावधीमध्ये सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. कालिदास सांस्कृतिक महोत्सव नि:शुल्क असून जास्तीत जास्त संख्येने कलारसिकांनी उपस्थित राहून सांस्कृतिक कलेचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉॅ. संजीव कुमार यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षामध्ये कालिदास महोत्सवाच्या आयोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त सुधाकर तेलंग, संजय धिवरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे तसेच कालिदास महोत्सव आयोजन समितीचे अधिकारी उपस्थित होते.
कवि कालिदास यांनी अमर काव्य ‘मेघदूतम’ ’अभिज्ञानशाकुंतलम’ सारख्या अजरामर नाटकाची रचना केली आहे. कालिदास महोत्सव ‘परंपरेचा पुन्हा आविष्कार’ हे ब्रीदवाक्य घेऊन नवीन संकल्पनासह रसिकांच्या भेटीला येत आहे. कालिदास महोत्सव नागपूर व रामटेकपर्यंत न राहता महाराष्ट्राची ओळख व्हावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन भव्य स्वरुपात करण्यात येत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलावंत कालिदास महोत्सवात आपली हजेरी लावून आपला कलाविष्कार सादर करणार आहे. कानासोबत मनाला देखील सांस्कृतिक मेजवानी मिळणार आहे.
विदर्भाच्या समृद्ध सांस्कृतिक वारसाकडे लक्ष वेधणे व पूर्व विदर्भ आणि नागपूरला राज्य व राष्ट्रीय स्तरावर प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून स्थापित करणे, असे उद्देश समोर ठेवून आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव महाकवी कालिदास व ऐतिहासिक वारसा संपन्न विदर्भभूमी यांच्या नात्याचा पुनरुच्चार करीत आहे.
कालिदास महोत्सवाच्या माध्यमातून या भागातील समृद्ध सांस्कृतिक, साहित्यिक व पुरातत्त्व वारसाकडे लोकांचे लक्ष वेधण्यात आजवर यशस्वी झाला असून येथील कलारसिकांनी भरभरुन दाद दिल्यामुळेच कालिदास महोत्सव नागपूरची विशेष सांस्कृतिक ओळख बनली असल्याचे डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालय, कालिदास महोत्सव आयोजन समिती, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व नागपूर महानगरपालिकेच्या सौजन्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.