जिऱ्याची फोडणी महागणार! पावसामुळे पिकाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2022 08:54 PM2022-03-24T20:54:26+5:302022-03-24T20:54:54+5:30
Nagpur News यंदा मध्यम दर्जाच्या जिऱ्याचे प्रतिकिलो दर गेल्यावर्षीच्या १४० ते १६० रुपयांच्या तुलनेत सध्या २४० रुपयांवर पोहोचले आहे. पुढील महिन्यात २८० रुपये प्रतिकिलोवर जाण्याची शक्यता ठोक विक्रेत्यांनी व्यक्त केली.
नागपूर : स्वयंपाकघरात सढळ हाताने वापरले जाणारे जिरे गेल्यावर्षीच्या तुलनेत महागणार आहे. राजस्थान, गुजरातमधील शेतकऱ्यांनी जिऱ्याची लागवड कमी केल्याने उत्पादनातही मोठी घट झाली आहे. याशिवाय मध्यंतरी आलेल्या पावसामुळे पिकावर परिणाम झाला आहे. नागपुरात सर्वाधिक माल गुजरातच्या उंझा येथून येतो. यंदा मध्यम दर्जाच्या जिऱ्याचे प्रतिकिलो दर गेल्यावर्षीच्या १४० ते १६० रुपयांच्या तुलनेत सध्या २४० रुपयांवर पोहोचले आहे. पुढील महिन्यात २८० रुपये प्रतिकिलोवर जाण्याची शक्यता ठोक विक्रेत्यांनी व्यक्त केली.
देशात जिऱ्याची लागवड राजस्थान आणि गुजरात राज्यात होते. गुजरातमधील सौराष्ट्र विभागातील कच्छ, भावनगर, राजकोट या भागातील शेतकरी आणि राजस्थानात पाकिस्तान सीमेलगतचे शेतकरी जिरे लागवड करतात. गेले तीन वर्ष राजस्थान आणि गुजरातमध्ये जिरे लागवडीत वाढ झाली होती. मात्र, अपेक्षेएवढे दर न मिळाल्याने यंदा शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविली. त्यामुळे यंदाच्या हंगामात जिरे लागवडीत मोठी घट झाली.
भाव २८० रुपयांपर्यंत जाणार
गेले तीन वर्ष जिऱ्याचे भाव १४० ते १६० रुपये प्रतिकिलो स्थिर होते. पण यंदा उत्पादन कमी झाल्यामुळे मार्चमध्ये भाव २४० रुपयांवर पोहोचले आहे. एप्रिल महिन्यात भाव २८० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे.
आवक घटली
यंदा उत्पादन कमी झाल्यामुळे इतवारी मुख्य बाजारात गेल्यावर्षीच्या तुलनेत आवक घटली आहे. ३ एप्रिलपासून बाजार पुन्हा सुरू झाल्यानंतर भाव काय राहील, यावर आवक अवलंबून राहील.
भारतातून जिऱ्याची निर्यात
भारत जिऱ्यासाठी मोठी बाजारपेठ आहे. गुजरात आणि राजस्थान येथून जिरे निर्यात होते. भारतातही गुजरातमध्ये उंझा, राजकोट आणि राजस्थानमध्ये जयपूर आणि जोधपूर या विकसित बाजारपेठा आहेत. देशात उत्पादन जास्त असल्यामुळे भारतातून चीन, कुवेत, युरोप, बांगलादेश, इराण या देशांत जिरे निर्यात केली जाते.
आणखी काही महिने दरवाढ राहणार
गेल्यावर्षीच्या तुलनेत जिऱ्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सध्या ठोक बाजारात २४० रुपये किलो भाव आहेत. जिऱ्याची मंडी ३ एप्रिलला पुन्हा सुरू होणार आहे. नंतरच नवीन भाव खुलतील. पण पुढे भाव वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. नागपूर जिऱ्यासाठी मोठी बाजारपेठ समजली जाते.
पूर्वेश पटेल, संचालक, नीरव ट्रेडिंग