खासगी कोरोना रुग्णालयांच्या मनमानीवर अंकुश लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:07 AM2021-05-31T04:07:22+5:302021-05-31T04:07:22+5:30
नागपूर : शहरातील खासगी कोरोना रुग्णालये बिले आकारताना मनमानी करीत असल्याचा आरोप माजी महापौर संदीप जोशी आणि पीडित नागरिक ...
नागपूर : शहरातील खासगी कोरोना रुग्णालये बिले आकारताना मनमानी करीत असल्याचा आरोप माजी महापौर संदीप जोशी आणि पीडित नागरिक संकल्प येवले, अवंती मेश्राम, हिमांशू पितळे, महादेव बोकडे व अविनाश तांडेकर यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात कोरोना प्रकरणातील न्यायालय मित्र अॅड. श्रीरंग भांडारकर यांच्याकडे मध्यस्थी अर्ज सादर केला आहे.
हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रलंबित आहे. न्यायालयाने या प्रकरणात थेट कोणताही मध्यस्थी अर्ज स्वीकारणे बंद केले आहे. त्याऐवजी अॅड. भांडारकर यांना मध्यस्थी अर्ज स्वीकारण्याची व केवळ आवश्यक मुद्द्यांवर न्यायालयात बाजू मांडण्याची परवानगी देण्यात आली आहे. परिणामी, सदर अर्ज त्यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. त्याद्वारे अर्जदारांनी खासगी कोरोना रुग्णालये मनमानी बिले आकारतात, केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक प्राधिकाऱ्यांनी वेळोवेळी जारी केलेल्या निर्देशांचे पालन करीत नाहीत, त्यांच्या पॅथालॉजी तपासणीच्या दरांमध्ये समानता नाही, रुग्णांनी केलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यास टाळाटाळ केली जाते, आदी गंभीर आरोप केले आहेत. तसेच, या बाबी लक्षात घेता न्यायालयाने खासगी कोरोना रुग्णालयांच्या मनमानीवर अंकुश लावण्यासाठी आणि पॅथालॉजी तपासणीच्या दरांमध्ये समानता आणण्यासाठी आवश्यक निर्देश द्यावे, अशी विनंती अर्जदारांनी केली आहे.