भरधाव धावणाऱ्या वाहनांना लगाम लावणार; नवनियुक्त प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2023 07:55 PM2023-05-31T19:55:08+5:302023-05-31T19:55:31+5:30
Nagpur News भरधाव धावणाऱ्या वाहनांना लगाम लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलल्या जातील, अशी माहिती अमरावती आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांनी दिली. त्यांनी आज नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ कार्यालयाचा अतिरीक्त पदभार हाती घेतला.
नागपूर : प्रवासी बसेससह ट्रक, ट्रेलर, डंपर यासारख्या ट्रान्स्पोर्ट वाहनांना स्पीड गव्हर्नर बसविणे बंधनकारक आहे. परंतु त्यानंतरही या वाहनांचा वेग ताशी ८०च्या खाली येत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे भरधाव धावणाऱ्या वाहनांना लगाम लावण्यासाठी आवश्यक ती पावले उचलल्या जातील, अशी माहिती अमरावती आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गिते यांनी दिली. त्यांनी आज नागपूर शहर व ग्रामीण आरटीओ कार्यालयाचा अतिरीक्त पदभार हाती घेतला.
‘लोकमत’शी बोलताना गिते म्हणाले, रस्ते अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन आवश्यक पावले उचलल्या जातील. वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी जनजागृतीसोबतच कारवाईची मोहिम हाती घेतली जाईल. रात्री वाहनांच्या तपासणीवर भर दिला जाईल. क्षमतेपेक्षा अधिक भार वाहून नेणाऱ्या ‘ओव्हरलोड’ वाहनांवर कठोर कारवाई केली जाईल. शाळा सुरू होण्यापूर्वी स्कूल बसची फिटनेस मोहिम हाती घेतली जाईल. वाहनचालकांच्या काही समस्या असल्यास त्यांनी कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करावी, असेही ते म्हणाले.
यावेळी पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भूयार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी डहाके यांच्यासह मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते.