शहरात २ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदी आदेश जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:08 AM2021-01-21T04:08:40+5:302021-01-21T04:08:40+5:30
नागपूर : विविध सण व उत्सवांच्या काळात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, म्हणून सार्वजनिक हिताच्या आणि शांतता ...
नागपूर : विविध सण व उत्सवांच्या काळात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, म्हणून सार्वजनिक हिताच्या आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी २ फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीसाठी शहरात कलम ३३ व ३६ लागू केले असून मनाई आदेश जारी केले आहे.
२१ जानेवारीपासून शाकंभरीदेवी नवरात्रोत्सव, २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती व दिवंगत बाळासाहेब ठाकरे जयंती, २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन, २८ जानेवारीला लाला लजपतराय जयंती व राजमाता जिजाऊ भोसले जयंती, ३० जानेवारीला हुतात्मा दिन, महात्मा गांधी पुण्यतिथी असे अनेक सण, उत्सव, दिन व कार्यक्रम या कालावधीत साजरे होणार आहेत. त्यासोबतच २९ जानेवारीपर्यंत डी.एड. परीक्षा शहरात तीन ठिकाणी घेण्यात येत आहे. २७ जानेवारीला ताजुद्दीन बाबा जन्मदिवस ताजबाग व छोटा ताजबाग दरगाह येथे साजरा होणार आहे. ३१ जानेवारीला शहरात सेंट्रल टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट दोन सत्रात २० केंद्रावर घेण्यात येणार आहे तसेच गणेश मंदिर हनुमान गड देवस्थान हिंगणा येथील आयोजित कार्यक्रमात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. नागरिकांस धोका, गैरसोय होऊ नये तसेच सार्वजनिक जागांवरील सर्व प्रकारच्या रहदारीचे विनियमन करणे सोयीचे व्हावे, रस्त्यावरील किंवा रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावाच्या प्रसंगी विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे व त्याचे पालन करणे जनतेस बंधनकारक राहणार आहे.