दलित समाजाला फुटीरतेचा शाप - रामदास आठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 03:26 PM2023-06-07T15:26:06+5:302023-06-07T15:26:36+5:30
दलित पँथरचा सुवर्णमहोत्सव
नागपूर : वैचारिक वाद झाल्यामुळे नेत्यांना दलित पँथर टिकवता आली नाही. आज दलित समाजात प्रत्येकजण आपल्याला अखिल भारतीय नेता समजतो. त्यामुळे रिपब्लिकन नेत्यांनी एकत्र यावे अशी भूमिका घेऊन ऐक्य होत नाही. दलित समाजाला फुटीरतेचा शाप लागलेला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
सिव्हील लाइन्सच्या वसंतराव देशपांडे सभागृहात दलित पँथरचा सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भुपेश थुलकर होते. व्यासपीठावर ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अर्जुन डांगळे, ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दिलीप जगताप, गौतम सोनवणे, भीमराव बन्सोड, सुधाकर तायडे, दयाल बहादुरे, बाळू घरडे, दिवाकर शेजवळ उपस्थित होते.
आठवले म्हणाले, रिपब्लिकन पक्ष सत्तेवर आला पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. परंतु धर्मांतरामुळे त्यांना रिपब्लिकन पक्षाची स्थापना करता आली नाही. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. दलित पँथरला आम्ही तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. रिपब्लिकन ऐक्यासाठी दलित पँथर बरखास्त करावी लागली. परंतु सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दलित पँथर पुन्हा उभी राहू शकते का याचा विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
भुपेश थुलकर यांनी दलित पँथर कुणाच्या नियंत्रणाखाली नव्हे तर स्वतंत्र बाण्याने उभी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी दयाल बहादुरे, दिवाकर शेजवळ, दिलीप जगताप यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात तुका कोचे, हरीश वंजारी, नगरसेविका उषा पायलट, चंद्रबोधी पाटील, संजय नगराळे आदी १३५ पँथरचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विजय आगलावे यांनी केले. संचालन राजन वाघमारे यांनी केले. आभार विनोद थूल यांनी मानले.