‘केबल’मुळे ग्राहक हतबल : ‘पॅकेज’बाबत प्रचंड संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 10:28 PM2019-02-06T22:28:19+5:302019-02-06T22:34:26+5:30
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नवीन नियमावलीप्रमाणे ग्राहकांचे ‘अच्छे दिन’ येणार असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात विविध वाहिन्यांच्या ‘पॅकेज’बाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नवीन नियमावलीप्रमाणे ग्राहकांचे ‘अच्छे दिन’ येणार असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात विविध वाहिन्यांच्या ‘पॅकेज’बाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. शहरातील ‘केबल ऑपरेटर्स’नी तर चक्क स्वतंत्र ‘पॅकेज’ तयार केले आहेत व सोयीस्करप्रमाणे ते ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. एकप्रकारे ग्राहकांच्या संभ्रमाचा फायदाच उचलण्यात येत आहे. दुसरीकडे शहरातील बऱ्याच ‘ऑपेरटर्स’ने ‘पेड चॅनेल’चे प्रसारण बंद केले आहे. यामुळे ग्राहक व ‘केबल ऑपरेटर्स’मध्ये वाद वाढले आहेत.
ग्राहकांना कोणत्या वाहिन्या पाहायच्या, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य ट्रायच्या या निर्णयामुळे मिळाल्याचा दावा केला जात असला तरीही मल्टीसर्व्हिस प्रोव्हायडरने (एमएसओ) मराठी व हिंदी वाहिन्यांचे स्वतंत्र ‘पॅकेज’ तयार करून केबल ऑपरेटर्सच्या माध्यमातून ग्राहकांवर लादू लागल्यामुळे ग्राहक आणि केबल ऑपरेटर्समध्ये निरंतर वाद होत आहे. ट्रायच्या आदेशानंतरही केबल ऑपरेटर्स मनमानी करीत असल्याचा आरोप ग्राहकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
छुप्या शुल्कामुळे ग्राहकांना मनस्ताप
नागपुरात यूसीएन, जीपीटीएल, इन केबल आणि सिटी केबल असे चार एमएसओ आहेत. सर्वांनी ट्रायच्या नियमाविरुद्ध मराठी आणि हिंदी वाहिन्यांचे स्वतंत्र चॅनल तयार केले असून, ते ग्राहकांवर लादत आहेत. सर्व वाहिन्यांनी पॅकेज जाहीर केल्यानंतरही छुप्या स्वरूपात जास्त शुल्क आकारण्यात येत आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास एका कंपनीचे २० वाहिन्यांचे पॅकेज ४९ रुपये असेल तर त्यावर १८ टक्के जीएसटी आणि नेट कॅपॅसिटी फीच्या नावाखाली प्रत्येक वाहिनीसाठी ८० पैसे शुल्क असे मिळून पॅकेजसाठी दरमहा ७४ रुपये आकारण्यात येत आहे. अर्थात ४९ रुपयांच्या पॅकेजवर २५ रुपये ग्राहकांना जास्त द्यावे लागत आहे. ‘ट्राय’च्या नियमाप्रमाणे एक वाहिनी निवडण्याची ग्राहकांना मुभा आहे. पण ‘एमएसओ’ने स्वतंत्र पॅकेज तयार करून ग्राहकांचा अधिकार हिरावला आहे. ‘एमएसओ’चा परवाना निलंबित करण्याची ग्राहकांची मागणी आहे.
केबल सेवा बुधवारी मध्यरात्रीपासून बंद होणार
शहराच्या अनेक भागातील जीपीटीएल, इन केबल आणि सिटी केबलच्या सेवा बंद झाल्या आहेत. ‘यूसीएन’ची सेवादेखील मध्यरात्रीपासून प्रभावित होण्याची शक्यता आहे.
ऑपरेटर्सतर्फे ‘पॅकेज’ची यादी देण्यास टाळाटाळ
ट्रायने केबल व्यवस्था सुरळीत करण्यासाठी जानेवारी महिना दिला होता. फेब्रुवारी महिन्याचे सहा दिवस लोटल्यानंतरही केबल ऑपरेटर्सचा एमएसओसोबत कमिशनवरून वाद सुरू असल्यामुळे त्यांनी अनेक ग्राहकांना फ्री चॅनल आणि पेड चॅनलची यादी दिलेली नाही. शिवाय ग्राहकांना ‘पॅकेज’ न निवडल्यास केबल सेवा बंद करण्याची धमकी देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून पॅकेजचे ५०० ते ६०० रुपयांपर्यंत आकारण्यात येत आहेत. केबल ऑपरेटर्सच्या मनमानीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी ग्राहक संघटनांनी केली आहे.