ग्राहकांना हवा भारतीय मोबाईल व लॅपटॉप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 09:24 PM2020-07-14T21:24:58+5:302020-07-14T21:27:19+5:30
चीनमधून कोरोनाचा जगभर फैलाव आणि लष्कराच्या कुरापतींमुळे भारतीय चिनी वस्तू खरेदीला नकार देत आहेत. मोबाईल, लॅपटॉप असो वा इतर कोणत्याही वस्तू चिनी नकोच, भारतीय अथवा इतर देशांच्या असल्या तरी त्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चीनमधून कोरोनाचा जगभर फैलाव आणि लष्कराच्या कुरापतींमुळे भारतीय चिनी वस्तू खरेदीला नकार देत आहेत. मोबाईल, लॅपटॉप असो वा इतर कोणत्याही वस्तू चिनी नकोच, भारतीय अथवा इतर देशांच्या असल्या तरी त्या खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. वर्क फॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईल, लॅपटॉप, टॅब या वस्तूंना मागणी वाढली आहे. या वस्तूंचा तुटवडा असला तरी भारतीय वस्तूंना प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे. सध्या लॅपटॉप आणि मोबाईलची विक्री पूर्वीपेक्षा दुप्पट, तिप्पट झाली आहे.
भारतीयांनी चीनवर बहिष्काराचे अस्त्र उभारले जात आहे. चीनला धडा शिकविण्याच्या उद्देशाने प्रत्येक भारतीय आणि व्यापारी चिनी वस्तू खरेदी न करण्याचे आवाहन करीत आहेत. त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकजण चीनच्या वस्तू नाकारत असल्याचे बाजारपेठेत चित्र आहे.
बाजारात चीनच्या विविध कंपन्यांसह भारतीय व इतर देशांमधील कंपन्यांचे मोबाईल लॅपटॉप, टॅब, संगणक व इतर पूरक साधने उपलब्ध आहेत. खरेदीसाठी आलेले ग्राहक चिनी वस्तूंना नाकारत भारतीय बनावटीच्या वस्तूंना पसंती देत आहेत. या वस्तू उपलब्ध नसल्यास चिनी वगळून इतर देशांच्या वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे. सध्या बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भारतीय वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच चिनी लॅपटॉप आणि मोबाईलची विक्री होत आहे. बाजारपेठेत चिनी वस्तूंचे वर्चस्व कमी करण्यासाठी व्यापारी आणि विविध संघटना प्रयत्न करीत आहेत. विशेषत: घरगुती उपकरणांमध्येही भारतीय बनावटीच्या वस्तूंचा शोध ग्राहकांकडून घेतला जात आहे.
कंपनी न बघता लोक करताहेत खरेदी
सध्या वर्क फॉम होम आणि ऑनलाईन शैक्षणिक प्रणालीमुळे लॅपटॉप, संगणक, वेबकॅम व टॅबला मागणी वाढली असून तीनपट विक्री होत आहे. पण मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. लोक गरजेपोटी कंपनी न पाहता या वस्तूंची खरेदी करीत आहेत. व्यावसायिकांना संधी उपलब्ध झाली आहे.
दिनेश नायडू, उपाध्यक्ष, विदर्भ कॉम्प्युटर मीडिया डीलर्स वेलफेअर असोसिएशन.
दहापैकी नऊ बॅ्रण्ड चीनचे
लॅपटॉपचे भारतीय ब्रॅण्ड तयार होण्यास पाच वर्षे लागतील. बाजारात दहापैकी नऊ ब्रॅण्ड चीनचे आहे. सध्या विक्री वाढली असून भारतीय ब्रॅण्ड उपलब्ध नसल्याने ग्राहक उपलब्ध ब्रॅण्ड खरेदी करीत आहेत. त्यांच्यासमोर पर्याय नाही. लोक चिनी उत्पादने नको असे म्हणत आहेत, पण त्यांच्यासमोर चिनी लॅपटॉपशिवाय पर्याय नाही.
ललित गांधी, सचिव, विदर्भ कॉम्प्युटर मीडिया डीलर्स वेलफेअर असोसिएशन.
मोबाईलची दिवाळीपेक्षा जास्त विक्री
विवो मोबाईल मेड इन इंडिया असल्याने लोकांची जास्त मागणी आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांकडून मागणी वाढल्याने दिवाळीपेक्षा दुप्पट, तिप्पट मागणी आहे. विक्री पुढील महिन्यात सामान्य होईल. बाजारपेठेत चिनी इफेक्ट दिसत आहे.
सूरजसिंग सावजी, विवो मोबाईल डीलर (नागपूर ग्रामीण)