ग्राहकांना आता वेळेत अचूक वीज बिल मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 11:49 AM2018-08-06T11:49:05+5:302018-08-06T11:50:21+5:30
महावितरणच्यावतीने वीज बिलांची छपाई व वितरण केंद्रीय स्तरावर करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली आहे. देशातील वीज वितरण क्षेत्रात अशा पद्धतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग प्रथमच होत असून यामुळे ग्राहकसेवा गुणवत्तेत मोठी वाढ होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणच्यावतीने वीज बिलांची छपाई व वितरण केंद्रीय स्तरावर करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली आहे. देशातील वीज वितरण क्षेत्रात अशा पद्धतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग प्रथमच होत असून यामुळे ग्राहकसेवा गुणवत्तेत मोठी वाढ होईल. त्यामुळे राज्यातील अडीच कोटीपेक्षा अधिक वीज ग्राहकांना आता वेळेत व अचूक वीज बिल मिळेल तसेच ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी अधिक कालावधी उपलब्ध होईल. महावितरणच्या सध्याच्या बिलिंग व्यवस्थेतील प्रक्रियेमुळे वीज बिलांची छपाई व ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी साधारणत: सात ते आठ दिवसांचा अवधी लागतो. ग्राहकांना वेळेत वीज बिल न मिळाल्यामुळे त्वरित देयक प्रदान दिनांकांतर्गत मिळणारी सूट (प्रॉम्टपेमेंट डिस्काऊंट) मिळण्यास ग्राहकांना अडचणी येत होत्या. याशिवाय वेगवेगळ्या एजन्सींद्वारे वीज बिलांची छपाई व वितरण होत असल्यामुळे त्यावर संनियंत्रण ठेवणे कठीण जात होते. या सर्व बाबींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी महावितरणच्यावतीने केंद्रीय पद्धतीने वीज बिलाची छपाई व वितरण करण्यात येणार आहे. मोबाईल मीटर रीडिंग अॅपमुळे प्रत्यक्षवेळी (रिअल टाइम) मीटरवाचन तसेच चेक रीडिंग उपलब्ध होत आहे. त्यामुळे या व्यवस्थेत जलद व दैनंदिन पद्धतीने बिलावरची संपूर्ण प्रक्रिया करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे ग्राहकांना जास्तीत जास्त अचूक वीज देयक मिळेल तसेच त्यांना वीज देयक भरण्यासाठी अधिकचा कालावधी मिळाल्यामुळे वीज देयक भरणा केंद्रातील रांगा कमी होतील व देयक भरणे अधिक सोयीचे होईल.