शीर आणि हातपाय कापलेले पोतेही मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 11:13 PM2019-07-11T23:13:16+5:302019-07-11T23:19:44+5:30
निर्दयपणे कापून पोत्यात भरलेले शरीराचे दुसरे अवयवही गांधीसागर तलावाच्या काठावर गुरुवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांना आढळले. शहारे आणणाऱ्या या हत्याकांडाने पोलीस दलही हादरले असून, हा तरुण कोण आणि त्याची एवढ्या निर्दयपणे कुणी हत्या केली, त्याचा पोलीस तपास करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, सीसीटीएनएसमधून नागपूर शहर आणि ग्रामीण भागासोबतच विदर्भातील ठिकठिकाणच्या जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती पोलिसांनी गोळा केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निर्दयपणे कापून पोत्यात भरलेले शरीराचे दुसरे अवयवही गांधीसागर तलावाच्या काठावर गुरुवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांना आढळले. शहारे आणणाऱ्या या हत्याकांडाने पोलीस दलही हादरले असून, हा तरुण कोण आणि त्याची एवढ्या निर्दयपणे कुणी हत्या केली, त्याचा पोलीस तपास करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, सीसीटीएनएसमधून नागपूर शहर आणि ग्रामीण भागासोबतच विदर्भातील ठिकठिकाणच्या जिल्ह्यातील बेपत्ता व्यक्तींची माहिती पोलिसांनी गोळा केली आहे.
गांधीसागर तलावात बुधवारी रात्री पोत्यात बांधलेले धड मिळाले होते. शरीराचे अन्य अंग गायब असल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली होती. गणेशपेठ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान, एका पोत्यात धड आढळले त्यामुळे शीर आणि इतर अवयव त्याच भागात असावे, असा अंदाज बांधून पोलिसांनी शोधाशोध केली असता, गुरुवारी सकाळी गणेशपेठ पोलिसांना दुसरे एक पोते आढळले. त्यात तरुणाचे शीर आणि इतर अवयव होते. डॉक्टरांच्या मदतीने पोलिसांनी ते सर्व अवयव जोडून त्या मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार, मृतक अंदाजे ३० वर्षांचा असावा, त्याचा वर्ण मध्यम गोरा, बारीक दाढी आणि मिशी काढलेली असल्याचे पोलीस सांगतात.
दरम्यान, या थरारक हत्याकांडाने पोलिसही हादरले आहेत. प्रकरणाची माहिती कळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेऊन सीसीटीएनएसच्या माध्यमातून नागपूर-विदर्भातील अनेक ठिकाणच्या बेपत्ता तरुणांची माहिती पोलिसांनी आज संकलित केली. त्यांच्यातून नमूद वर्णनाचा तरुण कोण, त्याची पडताळणी पोलीस करीत आहेत. ज्या पोत्यात मृतदेहाचे तुकडे आढळले, त्या पोत्यावर आढळलेल्या काही मजकुरांवरून पोलिसांनी व्यापाऱ्यांकडे चौकशी चालविली आहे.
अट्टल गुन्हेगारांचे कृत्य
मृताची ओळख पटल्यानंतर आरोपींचा छडा लावणे सोपी होणार आहे. एवढ्या निर्दयपणे हत्या करून शरीराचे तुकडे करणे, ते वेगवेगळ्या पोत्यात भरणे आणि नंतर त्याची अशा पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणे, सामान्य गुन्हेगारासाठी शक्य नाही. आरोपी अनेक असावेत, ते सराईत गुन्हेगार असावे आणि अनैतिक प्रकरणाची या हत्येला जोड असावी, असा तर्क बांधून पोलिसांनी चौकशीचे चक्र फिरविले आहे. अनैतिक संबंधातून हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून एका पोत्यात भरून फेकल्याची घटना यापूर्वी सीताबर्डीत उघडकीस आली होती.