रॉकेल कोट्यात कपात
By admin | Published: January 29, 2015 01:01 AM2015-01-29T01:01:08+5:302015-01-29T01:01:08+5:30
‘अच्छे दिन’ येणार म्हणून गोरगरीब जनता आस लावून बसली असतानाच रॉकेलच्या जानेवारी महिन्याच्या कोट्यात कपात करून सरकारने त्यांची झोप उडविली आहे.
फक्त एक लिटरचे वाटप : गोरगरीब चिंतित
मुस्तफा मुनीर - नागपूर
‘अच्छे दिन’ येणार म्हणून गोरगरीब जनता आस लावून बसली असतानाच रॉकेलच्या जानेवारी महिन्याच्या कोट्यात कपात करून सरकारने त्यांची झोप उडविली आहे.
कपातीचे कारणपुढे करीत रेशन दुकानदार ग्राहकांना फक्त एक लिटरचेच वाटप करीत आहे. त्यामुळे गरीब जनता चिंतित आहे.. बीपीएल कार्डधारक धीरज कुरील यांनी सांगितले की, अनेक दिवस रेशन दुकानात गेल्यानंतर आता रॉकेल मिळाले. या महिन्याच्या अखेरीस रॉकेलाचा पूर्ण कोटा प्राप्त होईल व पाच लिटर रॉकेल मिळेल, असे दुकानचालक सांगत होते. पण शेवटी सरकारी आदेशाचा हवाला देत फक्त एक लिटर रॉकेल देण्यात आले.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी होत असताना त्या तुलनेत पेट्रोल आणि रॉकेलच्या किमती कमी करण्याऐवजी सरकार गरिबांच्या रॉकेल कोट्यातच कपात करीत असल्याने नागरिकांच्या भावना संतप्त आहेत.
यासंदर्भात एका रेशन दुकान चालकाला विचारले असता त्यांनी सांगितले की, या महिन्याच्या कोट्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कपात होईल याची पूर्वकल्पना नव्हती. त्यामुळे सुरुवातीपासून ग्राहकांना निश्चित प्रमाणानुसार रॉकेलचे वाटप करण्यात आले. पण अचानक १७ जानेवारीनंतर कोटा कमी करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे दुकानदारांच्या अडचणी वाढल्या आणि नियोजनही बिघडले.
प्राप्त माहितीनुसार जानेवारीच्या सुरुवातीपासूनच पुरवठा विभागाकडून वितरकांना कमी रॉकेल दिले जात होते. पण अधिकाऱ्यांपासून तर वितरकांपर्यंत आणि दुकानदारांपर्यत सर्वांना जानेवारीच्या अखेरपर्यंत कोटा वाढवून मिळेल, असा अंदाज होता. पण तो फोल ठरला.
दरम्यान जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश वंजारी यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी रॉकेल कोट्यात ६६ टक्के कपात करण्यात आल्याचे सांगितले. ही कपात फक्त जानेवारी महिन्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र प्रत्यक्षात ही कपात ७८ टक्के असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)