डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘क्युट’ सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 11:26 AM2018-10-25T11:26:45+5:302018-10-25T11:29:24+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना ‘चेक इन’ करण्यासाठी अनेकदा लांबलचक रांगांमध्ये उभे राहावे लागते. मात्र आता ‘सीता’ या ‘सॉफ्टवेअर’मुळे हा त्रास कमी होणार आहे.
वसीम कुरैशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना ‘चेक इन’ करण्यासाठी अनेकदा लांबलचक रांगांमध्ये उभे राहावे लागते. मात्र आता ‘सीता’ या ‘सॉफ्टवेअर’मुळे हा त्रास कमी होणार आहे. विमातळावर प्रवाशांसाठी ‘क्युट’ सेवा (कॉमन युज टर्मिनल इक्विपमेंट) सुरू करण्यात आली आहे. या ‘सॉफ्टवेअर’मुळे विमानतळावर पाच आणखी नवीन ‘चेक इन काऊंटर्स’ सुरू करण्यात येणार आहेत.
एक वर्षाअगोदर विमानतळावर एका ‘एअरलाईन्स’साठी एकच ‘चेक इन काऊंटर’ होते. ‘सीता’मुळे आता कुठल्याही ‘काऊंटर’चा उपयोग कोणतीही ‘एअरलाईन्स’ करू शकते. एखाद्या ‘एअरलाईन्स’च्या विमानाचे ‘टेक आॅफ’ झाल्यानंतर प्रणालीला ‘लॉग आॅफ’ करण्यात येते. यानंतर त्याच प्रणालीवर दुसऱ्या ‘एअरलाईन्स’कडून ‘लॉग इन’ करून ‘चेक इन’ची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेचीदेखील बचत होईल. सोबतच ‘बोर्डिंग पास’ मिळविण्यासाठी ‘सेल्फ सर्व्हिस’देखील सुरू करण्यात आली आहे. यासाठी ‘किओस्क’ बसविण्यात आले आहेत. ‘सीता’च्या मदतीने वेळ वाचविण्यासाठी जी सुविधा देण्यात येत आहे, त्यासाठी प्रति प्रवासी ५०० रुपयांपर्यंत शुल्क घेण्यात येत आहे. त्यामुळे विमानतळाच्या महसुलात दरवर्षी अडीच ते तीन कोटींची भर पडणार आहे. ‘क्युट’ शुल्काचा ४४.१४ टक्के वाटा ‘एमआयएल’ला (मिहान इंडिया लिमिटेड) मिळतो, तर उर्वरित रक्कम ‘एअरलाईन्स’ व ‘सॉफ्टवेअर कंपनी’ला जाते. दरम्यान, या सुविधेमुळे प्रवाशांचा नेमका किती वेळ वाचत आहे, याची माहिती ‘एमआयएल’कडे नाही. प्रवासी सेवेसाठी शुल्क देत आहेत. त्यामुळे नेमका किती वेळ वाचेल, यासंदर्भात ‘एमआयएल’ने सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे.
महिनाभरात स्थापन होणार ‘काऊंटर्स’
विमानतळावर सद्यस्थितीत १६ ‘चेक इन काऊंटर्स’ आहेत. पुढील महिनाभरात ही संख्या २१ इतकी होणार आहे. ‘सेल्फ सर्व्हिस’च्या माध्यमातून ‘किओस्क’वर ‘बोर्डिंग पास’ घेण्याची सुविधा वाढविण्यात येत आहे. प्रवासी ‘किओस्क’वरच ‘पीएनआर’ क्रमांक टाकून ‘बोर्डिंग पास’चे ‘प्रिंट आऊट’ घेऊ शकतात, अशी माहिती ‘एमआयएल’चे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुलेकर यांनी दिली.