विना परवानगी वृक्ष कटाई, महापालिकेकडून पोलिसांत तक्रार
By नरेश डोंगरे | Published: June 11, 2024 11:04 PM2024-06-11T23:04:42+5:302024-06-11T23:04:51+5:30
महापालिकेच्या उद्यान विभागाच्या माहितीनुसार, मेयो परिसरात सुरू असलेल्या विकास कामांच्या निमित्ताने ४८ वृक्ष कापण्यास परवानगी देण्यात आली होती.
नागपूर : परवानगी न घेता मेयो हॉस्पिटल सर्जिकल कॉम्प्लेक्सजवळचे ८० वर्षे जुने झाड कापल्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाने पोलिसांकडे सोमवारी तक्रार नोंदवली. मात्र, पोलिसांकडून एफआयआर दाखल झाला की नाही, हे महापालिकेकडून अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस आता या प्रकरणात कोणती कारवाई करते, त्याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
महापालिकेच्या उद्यान विभागाच्या माहितीनुसार, मेयो परिसरात सुरू असलेल्या विकास कामांच्या निमित्ताने ४८ वृक्ष कापण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, ज्याची परवानगी नाही असा एक वृक्ष कापण्यात आला. 'ग्रीन सिटीचे टार्गेट' मिळवणाऱ्या उपराजधानीत वेगवेगळ्या भागात मनमानी पद्धतीने झाडांची कटाई होत असल्याची ओरड आहे.
पर्यावरणाची चिंता करणारे पर्यावरण प्रेमी या संबंधाने विविध भागात लक्ष ठेवून आहे. अलिकडेच लकडगंजमध्ये वल्लभभाई पटेल मैदानातदेखिल ८ झाडे कापण्यात आली होती. यासाठी परवानगी देताना कमालीची तत्परता दाखविण्यात आली होती. या संबंधाने पर्यावरण प्रेमी पोलिसांकडेही पोहचले होते. मात्र झाडांच्या कटाईची परवानगी असल्याचे सांगत पोलिसांनी कारवाई केली नव्हती.