नागपुरात पत्नीची गळा कापून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:48 AM2018-05-01T00:48:02+5:302018-05-01T00:48:38+5:30
प्रेमविवाहाच्या सहा महिन्यानंतरच माहेरी परतलेल्या पत्नीची युवकाने गळा कापून हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री मानकापूर पोलीस ठाण्याजवळील संत गजानननगर येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रेमविवाहाच्या सहा महिन्यानंतरच माहेरी परतलेल्या पत्नीची युवकाने गळा कापून हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री मानकापूर पोलीस ठाण्याजवळील संत गजानननगर येथे घडली. रक्ताने माखलेला पती पोलिसांच्या हाती लागल्यावर प्रकरण उघडकीस आले. वसीम ताज मोहम्मद पठाण (२४) रा. भवानीमातानगर पारडी असे आरोपी पतीचे नाव आहे तर कोमल ऊर्फ महिमा महादेव विठोले (२०) रा. संत गजानननगर असे मृताचे नाव आहे.
असीम आणि महिमा यांचे दीड वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्यात वाद होऊ लागले. कोमल वसीमला सोडून माहेरी परत आली होती. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता. हा वाद अनेकदा मानकापूर पोलीस ठाण्यातही पोहोचला. कौटुंबिक वाद असल्याने पोलिसांनी त्याला गांभीर्याने घेतले नाही. कोमलची इतरांशीही मैत्री असल्याचा असीमला संशय होता.
सूत्रानुसार वसीम सोमवारी रात्री ९ वाजता महिमाच्या घराजवळ आला. त्याने महिमाला चर्चा करण्याच्या बहाण्याने संत गजानननगरच्या गल्लीत बोलावले. ही जागा मानकापूर पोलीस ठाण्यापासून अगदी जवळ आहे. महिमा त्याला भेटण्यासाठी आली. तिथे दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वसीम तिची हत्या करण्याच्या उद्देशानेच धारदार शस्त्र घेऊन आला होता. त्याने महिमावर हल्ला केला. चाकूने तिच्या गळ्यावर व छातीवर अनेक वार केले. गळा कापून तिची हत्या केली. गल्लीत अंधार असल्याने कुणालाही कळले नाही. वसीम गल्लीत चाकू फेकून तिथून निघन गेला. महिमाची हत्या करून वसीम पायी जात होता. त्याचवेळी मानकापूर पोलीस ठाण्यातील डीबी पथकाचे ज्ञानेश्वर शेंडे, राजेश वरठी, जितेंद्र पारकुंडे, अंकलुश राठोड, रवी भुजाडे आणि अजय पाटील हे ठाण्यातून बाहेर पडले. त्यांची वसीमवर नजर गेली. त्याचे हात रक्ताने माखले होते. त्याला कुणी मारहाण केली असावी, असा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला थांबवत तुला कुणी मारले असे विचारले असता, त्याने महिमाला मारल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलीस गेले तेव्हा महिमाचा मृत्यू झाला होता.