सायबर सेल ठरतोय पांढरा हत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:08 AM2021-04-08T04:08:31+5:302021-04-08T04:08:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पोलीस आयुक्तांचा फेसबुक अकाउंट हॅक करणारे गुन्हेगार अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. सहा महिने ...

The cyber cell is a white elephant | सायबर सेल ठरतोय पांढरा हत्ती

सायबर सेल ठरतोय पांढरा हत्ती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पोलीस आयुक्तांचा फेसबुक अकाउंट हॅक करणारे गुन्हेगार अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाही. सहा महिने उलटले, तरी पोलिसांचे सायबर सेल गुन्हेगारांना पकडण्यात अपयशी ठरत आहे. सायबर सेलच्या अपयशामुळेच पीडित पोलीस कर्मचारी तक्रार करण्यासही मागे-पुढे पाहात आहेत.

सहा महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा फेसबुक अकाउंट हॅक करून काही लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्यात आली होती. अचानकपणे पोलीस आयुक्तांनी फ्रेंड्स रिक्वेस्ट पाठविल्यामुळे अनेक जण आश्चर्यचकीतही झाले होते. फेसबुकच्या प्रोफाइलवर अमितेशकुमार यांचाच गणवेश घालून असलेला फोटो लागलेला होता. त्यामुळे त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा कुणाला संशयही आला नाही. काही लोकांनी जेव्हा अमितेश कुमार यांना याबाबत माहिती दिली, तेव्हा खरा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर, सायबर सेल या प्रकरणाच्या तपासाला लागले. या दरम्यान शहर व ग्रामीण पोलीस विभागातील अनेक अधिकारी-कर्मचारी, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्राशी जुळलेल्या लोकांना फेसबुक अकाउंट हॅक करून पैसे मागण्यात आले. लोकांनी पोलिसांकडे तक्रारही केली. आपल्या तक्रारीची दखल घेत, पोलीस आयुक्तांचा फेसबुक अकाउंट हॅक करणाऱ्यास सायबर सेल नक्की अटक करेल, असा लोकांना विश्वास होता, परंतु सायबर सेल प्रकरणाचा तपासातच अपयशी ठरले आहे.

सायबर सेलच्या याच अपयशामुळे सायबर गुन्हेगार सर्रासपणे पोलीस अधिकाऱ्यांचे फेसबुक अकाउंट हॅक करून फसवणूक करीत आहेत. आठवडाभरापूर्वीच शहरातील एका ठाणेदाराचा फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आला. सायबर गुन्हेगार ठाणेदारांच्या मित्रांना पैशाची मागणी करू लागले. संबंधितांनी याबाबत ठाणेदाराला लगेच सूचित केल्याने सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली. ठाणेदाराच्या धर्तीवर अनेक जण सायबर गुन्हेगारांचे शिकार होत आहेत, परंतु सायबर सेलचे अपयश आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भीतीमुळे ते तक्रार करण्यास मागे-पुढे पाहत आहेत. आतापर्यंत २५ पेक्षा अधिक पोलीस अधिकारी-कर्मचारी सायबर गुन्ह्याचे शिकार झाल्याची माहिती आहे.

चौकट

वर्षभरापासून मिळाले नाही यश

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार घडले, परंतु सायबर सेलने गेल्या वर्षभरात एकाही मोठ्या प्रकरणाचा तपास लावलेला नाही. यावरूनच सायबेर सेल किती कार्यक्षम आहे, हे दिसून येते.

चौकट

ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार सातत्याने वाढत आहेत

कोविड संसर्गानंतर ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. लोक घरात आहेत. ते खरेदी करण्यासाठी किंवा इतर सेवांसाठी इंटरनेटचा वाापर करीत आहे. याचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. गेल्या वर्षभरात २० कोटी रुपयांपेक्षा अधिकची ऑनलाइन फसवणूक झाल्याची माहिती आहे.

Web Title: The cyber cell is a white elephant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.