सायबर कम्प्लेंट सेल सुरू
By admin | Published: May 21, 2017 02:25 AM2017-05-21T02:25:25+5:302017-05-21T02:25:25+5:30
सायबर गुन्हेगारीला आळा घालून पीडित नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी नागपुरात स्वतंत्र सायबर तक्रार निवारण केंद्र (सायबर कम्प्लेंट सेल) सुरू केले आहे.
पीडितांना मिळणार तातडीने दिलासा : सायबर गुन्हेगारी रोखण्याचे प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सायबर गुन्हेगारीला आळा घालून पीडित नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी नागपुरात स्वतंत्र सायबर तक्रार निवारण केंद्र (सायबर कम्प्लेंट सेल) सुरू केले आहे. या केंद्रातून सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याचे कसोशीने प्रयत्न केले जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. यावेळी सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे उपस्थित होते.
नोटबंदीनंतर कॅशलेस प्रक्रिया वेगवान झाली. आॅनलाईन शॉपिंग, आर्थिक व्यवहारासोबतच विविध कारणांमुळे इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे. दुसरीकडे सायबर गुन्हेगारीही वाढली आहे. काही आरोपी वेगवेगळे आमिष दाखवून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक करीत आहेत. लॉटरी लागल्याची, एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याची बतावणी करून फसवणूक केली जात आहे.
फेसबुक, व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून महिला-मुलींबाबत लज्जास्पद छायाचित्रे आणि मजकूर प्रसारित केले जात असून, त्यांना सामाजिक जीवनातून उठविण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशा प्रकरणातील पीडित व्यक्ती तक्रार करण्याचे धाडस दाखवत नाहीत. धाडस केले तरी आधी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करा, नंतर तेथून ही तक्रार सायबर सेलकडे पाठविली जाते. ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यातून पीडित व्यक्तींना अधिक मनस्ताप होतो. ही बाब लक्षात घेता पीडितांना तातडीने दिलासा मिळावा, त्यांना तक्रार करण्यासाठी इकडून तिकडे चकरा माराव्या लागू नये, म्हणून पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी सायबर कम्प्लेंट सेलची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासंबंधीच्या सूचना केल्या. त्यानुसार, प्रशासकीय इमारतीतील चौथ्या माळ्यावर आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात गेल्या १५ आॅगस्ट २०१६ ला अत्याधुनिक सायबर सेल सुरू करण्यात आला होता.
याच ठिकाणी ‘सी-३ सायबर कम्प्लेंट सेल’ सुरू करण्यात आला. सहायक आयुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक निरीक्षक विशाल माने हे या सेलचे प्रमुख आहेत. तक्रारकर्त्यांना न्याय देण्यासोबतच सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याची माहितीही आयुक्तांनी यावेळी पत्रकारांना दिली. यावेळी पोलीस उपायुक्त नीलेश भरणे, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, एसीपी पाटील, एपीआय माने उपस्थित होते.
तज्ज्ञांची मदत घेणार
या संबंधाने उपस्थित प्रश्नांची उत्तरे देताना पोलीस आयुक्त म्हणाले, येथे तज्ज्ञांची संख्या कमी आहे, हे मान्य. मात्र, गुन्ह्यांचे स्वरूप पाहून बाहेरच्या तज्ज्ञांची मदत घेतली जाईल. किती तक्रारी आल्या अन् काय कारवाई झाली, त्याबाबतही वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे. त्यासाठी एन कॉप्समध्ये संबंधितांच्या नियमित बैठका घातल्या जाईल. या बैठकीत कामकाजाचे विश्लेषणही करण्यात येईल. तक्रारी प्रलंबित राहू नये, तातडीने निपटारा केला जावा, यावरही भर देण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
इकडे सायबर सेलची सुरुवात झाली असतानाच तिकडे परिमंडळ तीन मधील सायबर सेलमध्ये कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याची माहिती आली. त्या संबंधाने प्रश्न उपस्थित झाला असता, वाईट प्रवृत्तीचे निष्कासन झालेच पाहिजे. पोलीस दलात वाईट आणि लाचखोर प्रवृत्तीला थारा नसल्याचेही पोलीस आयुक्तांनी म्हटले.