सायबर गुन्हेगाराने नागपुरात घातला बँकेला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 11:45 AM2018-11-23T11:45:10+5:302018-11-23T11:46:32+5:30
शहरातील एक प्रतिष्ठित कार वितरक बोलतो, असे सांगून एका ठगबाजाने स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाकडून ५ लाख, ५६ हजार रुपयांची रक्कम उत्तर प्रदेशातील एका बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील एक प्रतिष्ठित कार वितरक बोलतो, असे सांगून एका ठगबाजाने स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाकडून ५ लाख, ५६ हजार रुपयांची रक्कम उत्तर प्रदेशातील एका बँक खात्यात ट्रान्सफर करून घेतली. मंगळवारी २० नोव्हेंबरला ही बनवाबनवी घडली. ते लक्षात आल्यानंतर बँक व्यवस्थापकांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
स्टेट बँकेच्या सोमलवाडा शाखेत मंगळवारी बँकेचे सेवा व्यवस्थापक अनिल भगवान भालेराव कार्यरत असताना दुपारी १२.१६ वाजता त्यांना ९७५८८२९५५४ वरून फोन आला. आपण बरबटे नेक्सा कार शोरूममधून संचालक बोलतो. मला तात्काळ माझ्या खात्यातून दुसऱ्या व्यक्तीला रक्कम पाठवायची आहे, असे तो म्हणाला. भालेराव यांनी फोनवरून रक्कम वळती करण्यास नकार दिला असता आरोपीने त्यांना खाते बंद करून वरिष्ठांकडे तक्रार करण्याची धमकी दिली.
बरबटे यांचा बँकेतील मोठा आर्थिक व्यवहार बघता भालेराव दडपणात आले. त्यांनी त्याला मेल करण्यास सांगितले. त्यानुसार, ठगबाजाने बरबटे यांच्या बनावट आयडीचा वापर करून बँक व्यवस्थापकाला मेल पाठवला. आरोपीने आपली ओळख लपवित ५ लाख, ५५ हजार, ९६० रुपयांची रक्कम अंकुर जिंदल यांच्या नावे उत्तर प्रदेशातील कापोर्रेशन बँकेच्या खात्यात जमा करायला सांगितले. त्यानुसार, भालेराव यांनी ती रक्कम ट्रान्सफर केली.
पुन्हा पाठवले मेल
या व्यवहारानंतर भालेराव यांना पुन्हा काही मेल आरोपीने पाठवले आणि नवनवीन खात्यात रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यामुळे भालेराव यांना संशय आला. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. वरिष्ठांनी या व्यवहाराची माहिती बरबटे यांना कळविली. बरबटे यांनी आपण भालेराव यांना फोन अथवा मेल केल्याचा स्पष्ट इन्कार केला. त्यामुळे ठगबाजाने बँकेला गंडा घातल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. बँक व्यवस्थापक संदीप बाबाराव हजारे (वय ३२, रा. श्री नगर, मानकापूर) यांनी सोनेगाव ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.