सायबर गुन्हेगारांची जेवणाच्या थाळीवरही नजर; एका थाळीवर २ मोफत देण्याची थाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 09:42 AM2020-05-13T09:42:48+5:302020-05-13T09:43:08+5:30

नवनवीन शक्कल लढवून अनेकांच्या बँक खात्यातून रक्कम लंपास करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता चक्क जेवणाच्या थाळीवरही हात मारला आहे. एका थाळीवर दोन जेवणाच्या थाळी मोफत देण्याची थाप मारून सायबर गुन्हेगाराने नागपुरातील दोन जणांचे १६ हजार रुपये लंपास केले.

Cyber criminals also look at the dinner plate; 2 free on one plate | सायबर गुन्हेगारांची जेवणाच्या थाळीवरही नजर; एका थाळीवर २ मोफत देण्याची थाप

सायबर गुन्हेगारांची जेवणाच्या थाळीवरही नजर; एका थाळीवर २ मोफत देण्याची थाप

googlenewsNext
ठळक मुद्देबँक खात्यातील रक्कम साफ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवनवीन शक्कल लढवून अनेकांच्या बँक खात्यातून रक्कम लंपास करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी आता चक्क जेवणाच्या थाळीवरही हात मारला आहे. एका थाळीवर दोन जेवणाच्या थाळी मोफत देण्याची थाप मारून सायबर गुन्हेगाराने नागपुरातील दोन जणांचे १६ हजार रुपये लंपास केले. या घटनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे. प्रतापनगर चौकाजवळ गायत्री भोजनालय आहे. सध्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट बंद आहेत. बहुतांश व्यवहार ऑनलाईन होत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हेगारांनी ऑनलाइन फूड डिलिव्हरी देण्याची शक्कल लढवून त्यामाध्यमातून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढणे सुरू केले आहे.
येथील गायत्री भोजनालयाचे बनावट फेसबुक पेज तयार करून त्यावर त्यांनी ऑनलाईन एक थाळी मागविल्यास दोन थाळी जेवण मोफत देऊ, असे लिहिले होते. त्यावर आपला मोबाईल क्रमांकही टाकला होता. त्या मोबाईल क्रमांकावर शालू श्रीवास्तव आणि अन्य एका व्यक्तीने संपर्क करून क्रमश: जेवणाची ऑर्डर दिली. ही ऑर्डर स्वीकारल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी या दोघांनाही मोबाईलवर एक लिंक पाठविली. ती डाऊनलोड करून दहा रुपये आमच्या बँक खात्यात जमा करा. उर्वरित पैसे घरी जेवणाची थाळी पोहोचल्यावर द्या, असे त्याने म्हटले होते. त्यानुसार दोघांनीही प्रत्येकी दहा रुपये सायबर गुन्हेगाराच्या खात्यात जमा केले. त्यानंतर काही वेळातच महिलेच्या खात्यातून चार तर पुरुषाच्या खात्यातून १२ हजार, असे एकूण १६ हजार रुपये गुन्हेगाराने ट्रान्सफर करून घेतले. आपल्या बँक खात्यातील रक्कम कमी झाल्याची बाब लक्षात येताच दोन्ही पीडितांनी सायबर सेलमध्ये तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.

सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
या आणि अन्य ऑनलाइन गुन्ह्यांच्या अनुषंगाने स्थानिक सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाईन व्यवहार करताना आपला ओटीपी नंबर कोणालाही देऊ नये, अनोळखी लिंकवर आपल्या बँक खात्याची माहिती देऊ नये, गुगल फार्मच्या माध्यमातून लिंक तयार केली असल्यास त्यांच्या खालील बाजूस 'रिपोर्टिंग' हा पर्याय असतो. तो निवडावा म्हणजे ती लिंक गुगलकडून डिलीट केली जाईल, असेही सुचविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नागपूर सायबर सेलच्या ०७१२-२५६६७६६ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन सायबर सेलच्या सहायक पोलीस निरीक्षक जगताप यांनी केले आहे.

 

Web Title: Cyber criminals also look at the dinner plate; 2 free on one plate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.