नागपुरात सायबर गुन्हेगारांनी केले बँक खाते साफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 07:48 PM2020-08-04T19:48:13+5:302020-08-04T19:49:59+5:30
बजाजनगरातील एका व्यक्तीच्या खात्यातून सायबर गुन्हेगारांनी एप्रिल ते जुलै २०२० या तीन महिन्याच्या कालावधीत दोन लाख ७९ हजार रुपये ऑनलाईन लंपास केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बजाजनगरातील एका व्यक्तीच्या खात्यातून सायबर गुन्हेगारांनी एप्रिल ते जुलै २०२० या तीन महिन्याच्या कालावधीत दोन लाख ७९ हजार रुपये ऑनलाईन लंपास केले.
पीडित व्यक्ती बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहतात. त्यांचे बँक ऑफ इंडियाच्या व्हीएनआयटी शाखेत खाते आहे. १४ एप्रिल २०२० पर्यंत त्यांच्या खात्यात २ लाख ८८ हजार ९२० रुपये जमा होते. ५ जूनला त्यांच्या मुलांनी ३० हजार रुपयांची खरेदी केली. २१ जुलैला पीडित व्यक्तीला बँकेकडून मेसेज आला की त्यांच्या खात्यात १५,४६३ रुपये शिल्लक आहेत. त्यामुळे ते बँकेत गेले आणि त्यांनी पासबुक अपडेट करून घेतले यावेळी त्यांना त्यांच्या खात्यात १४,१३७ रुपये जमा असल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी बँक अधिकाऱ्याकडे विचारपूस केली असता सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या खात्यातून २ लाख ७९ हजार रुपये परस्पर काढून घेतले, असे उघड झाले. विशेष म्हणजे, पीडित व्यक्तीने कोणतीही लिंक ओपन केली नाही आणि ज्या कालावधीत सायबर गुन्हेगाराने ऑनलाईन रक्कम लंपास केली, त्या कालावधीत बँकेकडून पीडित व्यक्तीला कोणताही मेसेज आला नाही. दरम्यान, पीडित व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी बजाजनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.