सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांवर सायबर टोळीचा डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 11:00 AM2020-09-09T11:00:51+5:302020-09-09T11:02:33+5:30
नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा पोलीस ठाण्यात एका आशा वर्करने तक्रार केली आहे. वैद्यकीय अधिकारी सांगून आशा वर्करकडून सरकारी योजनांची माहिती त्याने मागितली होती. ही बाब तिच्या लक्षात आल्यावर त्या आशा वर्करला सायबर गुन्हेगाराने अश्लील शिवीगाळ केली.
मंगेश व्यवहारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बँकेचे माहिती घेऊन खाते रिकामे करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या टोळ्यांनी अनेकांना फसविले आहे. आता हे गुन्हेगार सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांचा लाभसुद्धा हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. नागपूर जिल्ह्यातील जलालखेडा पोलीस ठाण्यात एका आशा वर्करने तक्रार केली आहे. वैद्यकीय अधिकारी सांगून आशा वर्करकडून सरकारी योजनांची माहिती त्याने मागितली होती. ही बाब तिच्या लक्षात आल्यावर त्या आशा वर्करला सायबर गुन्हेगाराने अश्लील शिवीगाळ केली.
७८०१९७५६२२ या क्रमांकावरून नागपूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या ७ ते ८ आशा वर्कर यांना कॉल आला. त्याने स्वत:ला आरोग्य विभागातील अधिकारी सांगून प्रधानमंत्री मातृवंदन योजना व जननी सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती मागितली. आशा वर्करने त्याच्यावर योजनेच्या लाभार्थ्यांची माहितीही दिली. ही माहिती आशा वर्करच्या वरिष्ठांपर्यंत पोहचल्यानंतर त्यांनी संपूर्ण आशा वर्करच्या ग्रुपवर अनोळख्या व्यक्तीला माहिती देऊ नका, असे आवाहन केले. दरम्यान, जलालखेड्यातील एका आशा वर्करला त्याच क्रमांकावरून पुन्हा कॉल आला. मात्र तिने माहिती देण्यास नकार दिल्याने तिला अश्लील शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान, तिने जलालखेडा पोलिसात तक्रारही दाखल केली. या क्रमांकाला ट्रू कॉलरवर सर्च केले असता, राजकुमार असे लिहून आले. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना रोख स्वरूपात लाभ मिळतो. हा सायबर गुन्हेगार आशा वर्करच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे मोबाईल नंबर घेऊन, लाभार्थ्यांना थेट कॉल करून बँकेच्या खात्याची माहिती करून घेतो. शासनाकडून मिळालेला लाभ परस्पर उचलून घेत असल्याचा संशय आहे.
- कुणीही माहिती देऊ नये
आशा वर्कर असो की लाभार्थी यांनी अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलला प्रतिसाद देऊ नये. लाभार्थ्यांची वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कुठल्यातरी राज्यातून कॉल करणाऱ्या हिंदी भाषिक व्यक्तीला आशा वर्करचे मोबाईल नंबर कसे मिळाले, यासंदर्भात आरोग्य विभाग वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे.