पोलीस ठाण्यातही दाखल होतील सायबरशी संबंधित गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2022 07:46 PM2022-11-01T19:46:12+5:302022-11-01T19:46:44+5:30
Nagpur News शहरात सायबर गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत असून, यापुढे सायबरशी संबंधित सर्व तक्रारींवर प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
नागपूर : शहरात सायबर गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत असून, यापुढे सायबरशी संबंधित सर्व तक्रारींवर प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
सदरच्या छावणी येथील पटेल बंगल्यातील सायबर पोलीस स्टेशनच्या स्वतंत्र इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) नवीनचंद्र रेड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त नी जैन, उपायुक्त (गुन्हे) चिन्मय पंडित, उपायुक्त डॉ. संदीप पखाले, उपायुक्त गजानन राजमाने, सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन फटांगरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबरशी संबंधित गुन्हे दाखल होतील. सोबतच तक्रारकर्ता सायबर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून तक्रार करीत असल्यास त्याची तक्रारही सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येईल. कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांचे नोडल ऑफिसर संबंधित तपास अधिकाऱ्यास मदत करतील.
काही दिवसांपूर्वी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक सहायक पोलीस निरीक्षक, हवालदार आणि पोलीस कर्मचाऱ्यांसह एक सायबर सेल गठीत करण्यात आला आहे. महिलांच्या फेसबुक व सोशल मीडियावर बदनामीच्या तक्रारी संबंधित ठाण्यात दाखल होतील. ऑनलाइन सायबर पोर्टलवर २ हजार तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचा निपटारा ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत होणे अपेक्षित असल्याची माहिती त्यांनी दिली. संचालन सहायक पोलीस निरीक्षक अमोल दौंड यांनी केले. आभार सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी लोखंडे यांनी मानले.
सायबर इंटेलिजन्स युनिटची स्थापना
- सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी सायबर इंटेलिजन्स युनिटची स्थापना करण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले. या युनिटच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपप्रचार करणाऱ्या सायबर गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. एखाद्या महिलेविरुद्ध आपत्तीजनक संदेश व्हायरल करणारे कायद्याचे उल्लंघन करून मॅसेज प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. हे युनिट सोशल मिडिया लॅबअंतर्गत काम करणार आहे.
गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा
- पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, गेल्या २० वर्षांच्या तुलनेत गुन्हेगारी घटना कमी करण्यात पोलिसांना बऱ्यापैकी यश मिळाले आहे. यानुसार खुनाच्या घटना ३० टक्के कमी झाल्या आहेत. तर हल्ल्याच्या घटना ३८ टक्के, शासकीय कामात अडथळा आणण्याच्या घटना ४५ टक्के आणि बलात्काराच्या घटना ५ टक्के कमी झाल्या आहेत. बलात्काराच्या घटनात ९९ टक्के घटना पीडितेच्या ओळखीच्या आणि नातेवाइकांकडून झाल्याचे त्यांनी सांगितले.
...............