सोशल मीडियावर सायबरचा वॉच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 11:08 AM2019-08-05T11:08:09+5:302019-08-05T11:09:50+5:30
सोशल मीडियाचा गैरवापर करून सणासुदीच्या दिवसात धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाºया समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी पोलिसांचा सायबर सेल सूक्ष्म नजर ठेवून राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोशल मीडियाचा गैरवापर करून सणासुदीच्या दिवसात धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्यासाठी पोलिसांचा सायबर सेल सूक्ष्म नजर ठेवून राहणार आहे. शांतताप्रिय आणि सामाजिक सलोख्याचा आदर्श निर्माण करणारे शहर म्हणून नागपूरची ओळख आहे. भविष्यातही ती तशीच राहील, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले.
नागपंचमीपासून सणोत्सवाला प्रारंभ होत आहे. ईद, रक्षाबंधन आणि त्यानंतर एकापाठोपाठ सणांची मालिका सुरू होईल. सणासुदीच्या कार्यकाळात सोशल मीडियाचा गैरवापर करून काही समाजकंटक धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मोठ्याने डीजे वाजविणे, मिरवणुकीच्या वेळी विशिष्ट ठिकाणी जास्त वेळ थांबून गुलाल उधळणे, बॅण्ड, ढोल ताशे वाजवत गोंधळ घालणे, असे प्रकार करतात. यातून सामाजिक वातावरण दूषित होण्याचा धोका असतो. हा सर्व प्रकार होऊ नये म्हणून पोलीस कार्यरत असतातच मात्र विविध समाजातील सामाजिक नेते-कार्यकर्ते सक्रिय झाल्यास उपद्रवी मंडळी धाडस करत नाही. या पार्श्वभूमीवर, शहर पोलिसांनी हॉटेल रजवाडा पॅलेसमध्ये शांतता समितीची शनिवारी बैठक घेतली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय होते. तर,बैठकीतला आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. प्रकाश गजभिये, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर, शशिकांत महावरकर शहरातील विविध भागातील शांतता समितीचे सदस्य,महानगरपालिकेचे तसेच विविध विभागाचे शासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.
हल्लीचे युवक, तरुण, तरुणी सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय राहतात. त्यातून त्यांचे मन कलुषित करण्याचेही समाजकंटक प्रयत्न करतात. नैराश्य आल्याने अनेक नेटीजन्स आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांवर विशेष लक्ष ठेवावे, अशी सूचना यावेळी पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
शांतता समितीच्या बैठकीच्या आयोजनाचा उद्देश पोलीस उपायुक्त निर्मलादेवी यांनी प्रास्तविकातून विशद केला तर, उपायुक्त राहुल माकणिकर यांनी आपल्या खास शैलीने ‘पोलिसांनी काय केले पाहिजे’, त्याबाबत नागरिकांना बोलते केले.
गणेशोत्सवापूर्वी करा रस्त्याची कामे
मेट्रोच्या कामामुळे रस्ते खराब झाले आहेत. ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहतुकीत अडसर निर्माण होतो. मिरवणुकीच्या दिवशी मेट्रोची कामे बंद ठेवावी. मोठ्या वाहनासाठी वाहतुकीला प्रतिबंध करावा. पथदिवे आणि रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करून गणेशोत्सवाच्या पूर्वी ही कामे पूर्ण करावी, अशा सूचना यावेळी मान्यवरांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. शांतता समितीच्या सदस्यांना पोलिसांकडून ओळखपत्र देण्याचेही या बैठकीत ठरले.
उपद्रवी मंडळींना आवरा
बैठकीत सहभागी विविध अधिकारी आणि शांतता समितीच्या सदस्यांनी सणोत्सवाच्या कार्यकाळात उपद्रवी मंडळींचे काही अनुभव कथन केले. ईदच्या निमित्ताने प्राण्यांची वाहतूक केली जाते. काही संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून ही वाहने अडवून नाहक त्रास दिला जातो. खंडणी वसुली किंवा पोलीस कारवाईचा धाक दाखवून वाद घातला जातो. हे प्रकार घडू नये, संवेदनशील परिसर, झोपडपट्ट्या, निर्जनस्थळी पोलिसांनी गस्त वाढवावी, असेही यावेळी अनेकांनी सांगितले.