राजकारणात सायबर क्राईम

By admin | Published: August 26, 2015 03:01 AM2015-08-26T03:01:34+5:302015-08-26T03:01:34+5:30

एरवी ‘सायबर क्राईम’ म्हटले की व्यवसाय, ‘आयटी’ किंवा ‘बँकिंग’ ही क्षेत्रे डोळ्यासमोर येतात.

Cybercrime in politics | राजकारणात सायबर क्राईम

राजकारणात सायबर क्राईम

Next

एकूण गुन्ह्यांत महाराष्ट्र ‘टॉप’ : विद्यार्थी सक्रिय, फसवणुकीचे प्रकार अधिक
योगेश पांडे नागपूर
एरवी ‘सायबर क्राईम’ म्हटले की व्यवसाय, ‘आयटी’ किंवा ‘बँकिंग’ ही क्षेत्रे डोळ्यासमोर येतात. परंतु ‘ई-क्रांती’च्या युगात राजकारणदेखील ‘सायबर क्राईम’पासून अलिप्त राहिलेले नाही. २०१४ साली महाराष्ट्रात राजकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तीदेखील ‘सायबर क्राईम’मध्ये सहभागी असल्याचे दिसून आले. राजकीय कारणांमुळे ३९ गुन्हे घडले व विविध स्तरांवरील १५ राजकीय व्यक्तींना अटक करण्यात आली. ‘एनसीआरबी’च्या (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो) २०१४ सालच्या आकडेवारीनुसार ही धक्कादायक बाब समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे २०१४ साली देशामध्ये सर्वात जास्त ‘सायबर क्राईम’चे गुन्हे महाराष्ट्रात नोंदविण्यात आले आहेत.
गुन्ह्यांमध्ये १०७ टक्क्यांची वाढ
२०१४ साली संपूर्ण राज्यात १ हजार ८७९ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. २०१३ साली हीच संख्या ९०७ इतकी होती. म्हणजेच एका वर्षात ‘सायबर क्राईम’च्या गुन्ह्यांमध्ये १०७.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान, वर्षभरात ९५२ गुन्हेगारांना अटक करण्यात यश आले. ‘सायबर क्राईम’मध्ये विद्यार्थी सक्रिय होण्याचे प्रमाण वाढले आहे. अटक झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९२ इतकी असून २०१३ च्या तुलनेत बरीच वाढ आहे. ही बाब नक्कीच चिंतीत करणारी आहे.
गुन्ह्यांचे ‘मनी कनेक्शन’
महाराष्ट्रात झालेल्या ‘सायबर क्राईम’पैकी सर्वात जास्त ४०१ गुन्हे हे आर्थिक लाभ किंवा फसवणुकीसाठी झाले आहेत. तर ३१५ गुन्हे हे महिलांच्या लैंगिक छळवणुकीशी संबंधित आहे. यात याची टक्केवारी १६ टक्के इतकी आहे. समाजात तेढ पसरविण्याच्या उद्देशाने ११३ गुन्हे घडले आहेत.
नात्यांमध्ये ‘आॅनलाईन’ छळवणुकीचा ‘व्हायरस’
बहुतांश प्रकरणे समोर येतच नसली तरी सरकारी आकडेवारीनुसार ‘आॅनलाईन’ माध्यमातून छेडखानी किंवा छळवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे बऱ्याच प्रकरणांत गुन्हेगार हे जवळील नातेवाईक किंवा परिचित व्यक्ती असल्याचे निदर्शनास आले आहे. जवळच्या नात्यांमध्ये अशाप्रकारे छळवणुकीचा ‘व्हायरस’ ही भविष्यातील एक मोठी समस्या बनण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Cybercrime in politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.