सायबर गुन्हेगारांनी शोधला फसवणुकीचा 'हा' नवा फंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2022 07:20 AM2022-02-17T07:20:00+5:302022-02-17T07:20:01+5:30
Nagpur News सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी जुनी पद्धत वापरणे कमी केले आहे. त्या ठिकाणी गुन्हेगारांकडून नवी पद्धत वापरण्यात येत आहे.
आशिष दुबे
नागपूर : तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय आहात तर सावध राहा. कोणत्याही जाळ्यात अडकण्यापासून आपला बचाव करा. कारण सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईन फसवणूक करण्यासाठी जुनी पद्धत वापरणे कमी केले आहे. त्या ठिकाणी गुन्हेगारांकडून नवी पद्धत वापरण्यात येत आहे. त्या माध्यमातून ते नागरिकांची फसवणूक करीत आहेत. यात फसवणूक झालेल्या व्यक्तीला बराच काळ त्याची माहितीही होत नाही. समजले तेंव्हा खूप उशीर झालेला असतो, अशी ही पद्धत आहे.
स्मार्ट फोनचा वापर वाढल्यानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ पोस्ट करण्यात येतात. यातील काही व्हिडिओ अधिकृत व नामवंत संस्था, संघटना, व्यक्ती किंवा टीव्ही चॅनल तर्फे थेट टाकण्यात येतात. या व्हिडिओत स्मार्ट फोनचा स्मार्ट पद्धतीने वापर करण्याची पद्धत शिकविण्यात येते. या व्हिडिओची लोकप्रियता पाहून सायबर गुन्हेगारांनी ही पद्धत अंगीकृत केली आहे. ते न्यू मीडिया टेक्निक शिकविण्याचा फंडा वापरत आहेत. यात गृहिणीच नव्हे, तर उच्चशिक्षित लोकही फसल्या जात आहेत.
सोशल मीडियावर यावेळी अनेक पद्धतीचे पेज व प्लॅटफॉर्म आहेत. त्यात न्यू मीडिया टेक्निक शिकविण्याचा दावा करण्यात येतो. त्यामुळे अनेकजण याला सहज बळी पडतात. यात तुम्ही सहज कोणाचेही व्हॉट्सॲप हॅक करू शकता, असा दावा करण्यात येतो. कोणाचेही मॅसेज वाचू शकता, कोणाचाही कॉल ऐकू शकता, एवढेच नाही तर कोणाचाही फोन हॅक करू शकत असल्याचा दावा करण्यात येतो. तर काही व्हिडिओत तुमचा सामान्य कॅमेरा एका चुटकीत उच्च तांत्रिक कॅमेऱ्याचे काम करणार असल्याचा दावा करण्यात येतो. दावा केल्यानंतर हे फंडे कसे वापरायचे हे सुद्धा आरोपी त्या व्हिडिओत सांगतात. त्यानंतर कॉमेंट बॉक्समध्ये एक लिंक देण्यात येते. या क्लिंकवर गेल्यानंतर एक ॲप डाऊनलोड करायला सांगण्यात येते. अनेकजण हे ॲप डाऊनलोड करतात. त्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे समजते.
द्यावी लागते परवानगी
ॲप डाऊनलोड केल्यानंतर युझर्सला ॲपचा वापर करण्यापूर्वी आपल्या फोनच्या वापराची परवानगी द्यावी लागते. परवानगी दिल्यानंतर विशेष आयडीतून लॉगिन करावे लागते. त्यानंतर तुम्ही ॲपचा वापर करू शकता.
..........