गॅस सिलिंडरच्या स्फाेटात घराची राख, कुटुंब उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 12:05 PM2022-03-16T12:05:02+5:302022-03-16T12:33:44+5:30

घटनेच्यावेळी घरातील मंडळींनी घराबाहेर पळ काढल्याने जीवितहानी टळली.

cylinder blast causes fire in a house in narkhed tehsil | गॅस सिलिंडरच्या स्फाेटात घराची राख, कुटुंब उघड्यावर

गॅस सिलिंडरच्या स्फाेटात घराची राख, कुटुंब उघड्यावर

googlenewsNext
ठळक मुद्देसुदैवाने जीवितहानी टळली माेवाड शहरातील घटनातीन लाख रुपयांचे नुकसान

लाेकमत न्यूज नेटवर्क

माेवाड (नागपूर) : शहरातील शेतमजुराच्या घरात असलेत्या गॅस सिलिंडरने अचानक पेट घेत काही वेळात त्याचा स्फाेट झाला आणि आगीने संपूर्ण घराला कवेत घेतले. या आगीत घरातील संपूर्ण साहित्य व जीवनावश्यक वस्तूंची राख झाल्याने संपूर्ण कुटुंब क्षणार्धात उघड्यावर आले. यात किमान तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आग पीडिताने दिली. ही घटना मंगळवारी (दि. १५) दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास घडली. घटनेच्यावेळी घरातील मंडळींनी घराबाहेर पळ काढल्याने जीवितहानी टळली.

परसराम बनाईत (६५, वाॅर्ड क्रमांक-१२, माेवाड, ता. नरखेड) हे मंगळवारी सकाळी कामावर गेले हाेते, तर कुटुंबीय घरीच हाेते. दरम्यान, दुपारी चहा करायचा असल्याने त्यांच्या पत्नीने गॅसची शेगडी पेटवून त्यावर भांडे ठेवले व कामानिमित्त बाहेर केली. त्याच वेळी गॅस सिलिंडरच्या नळीने पेट घेतला. ही आग घरातील इतर वस्तूंना लागल्याने आगीने संपूर्ण घर कवेत घेतले. घरातून माेठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे तसेच आग लागल्याचे लक्षात आल्यावर कुटुंबीयांना शेजाऱ्यांनी घराबाहेर काढण्यात मदत केली.

काही वेळात त्या सिलिंडरचा स्फाेट झाला. मात्र, घरात कुणीही नसल्याने तसेच नागरिक घरापासून दूरवर उभे असल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. माहिती मिळताच माेवाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठून पाण्याचा मारा करीत आग नियंत्रणात आणली. घराचे छत लाकडी व काैलारू असल्याने या आगीत आतील साहित्य व वस्तूंसह संपूर्ण घराची राख झाली. पाेलीस विभागाचे नीलेश खेरडे, हेमंत बाभूळकर, विद्युत विभागाचे अभियंता अनिकेत खोंड, राजू लाडे, प्रफुल्ल बन्सोड, महसूल विभागाचे यावरलकर यांच्या उपस्थितीत तलाठी बजरूपे व डवरे यांनी पंचनामा केला.

तीन लाख रुपयांचे नुकसान

या आगीत गहू, तांदूळ, डाळ, कपडे, इतर गृहाेपयाेगी साहित्य तसेच ९,५०० रु. जळाल्याने किमान तीन लाख रुपयांचे नुकसान झाले, अशी माहिती परसराम बनाईत यांनी दिली. आगीत मुलाचे ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, इतर महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याचे त्यांनी सांगितले. सूचना देऊन अग्निशमन दलाचे जवान एक तास उशिरा घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती शेजारी व काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. अग्निशमन दलाचे जवान वेळीच घटनास्थळी दाखल झाले असते तर नुकसानीची तीव्रता कमी असती, असेही काहींंनी सांगितले.

तीन महिन्याचा चिमुकला सुखरूप

परसराम बनाईत यांच्या घरातील सदस्यांची संख्या १० आहे. घटनेच्यावेळी इतरांसह त्यांनी पत्नी, सून व तीन महिन्यांचा चिमुकला हाेता. घराला आग लागल्याचे लक्षात येताच शेजाऱ्यांनी चिमुकल्यासह घरातील सर्वांना सुखरूप बाहेर काढले. आपण शेतमजुरी करून उपजीविका करताे. या आगीत आपले माेठे नुकसान झाले आहे. आपली आर्थिक परिस्थिती विचारात घेता सरकारने आपल्याला त्वरित आर्थिक मदत करावी, अशी मागणीही परसराम बानाईत यांनी केली आहे.

Web Title: cylinder blast causes fire in a house in narkhed tehsil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.