सिलिंडर एक हजारपार; महागाईचा आगडोंब उसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2022 09:21 PM2022-03-22T21:21:34+5:302022-03-22T21:23:46+5:30

Nagpur News तब्बल १७१ दिवसांनंतर घरगुती गॅस सिलिंडर आणि १४१ दिवसांनंतर पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढविल्यानंतर मंगळवारी गरीब आणि सामान्यांवर आणखी एक महागाईचा आगडोंब उसळला आहे.

Cylinder rate above one thousand; Inflation soared | सिलिंडर एक हजारपार; महागाईचा आगडोंब उसळला

सिलिंडर एक हजारपार; महागाईचा आगडोंब उसळला

googlenewsNext
ठळक मुद्देगरीब, सामान्यांना सर्वाधिक फटकापेट्रोल, डिझेलचीही दरवाढ, सबसिडी केवळ ४०.१० रुपये

नागपूर : तब्बल १७१ दिवसांनंतर घरगुती गॅस सिलिंडर आणि १४१ दिवसांनंतर पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढविल्यानंतर मंगळवारी गरीब आणि सामान्यांवर आणखी एक महागाईचा आगडोंब उसळला आहे. सिलिंडरची किंमत एक हजारापार गेली आहे. नवीन दर मंगळवारपासून लागू करण्यात आले असून, गृहिणींचे महिन्याचे बजेट वाढले आहे.

याआधी १४.२ किलो घरगुती गॅस सिलिंडरचे दर ऑक्टोबर महिन्यात १५ रुपयांनी वाढून ९५१ रुपयांवर गेले होते. तेव्हापासून तब्बल १७१ दिवस हे दर स्थिर होते; पण मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी ५० रुपयांची वाढ केल्यानंतर दर १,००१ रुपयांवर पोहोचले आहेत. पुढे दरवाढीची आणखी शक्यता आहे. गरीब आणि सामान्यांना सिलिंडर खरेदीसाठी मोठी कसरत करावी लागेल.

पेट्रोल ११०.५३ रुपये आणि डिझेल ९३.३५ रुपये प्रति लिटरवर गेले आहे. दोन्ही इंधनात प्रति लिटर ८० पैशांची वाढ झाली आहे. दरवाढीसाठी रशिया-युक्रेन युद्धाचे कारण सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची वाढलेली किंमत बघता आता पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढणार असून, आधीचा विक्रमदेखील मोडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या किमतीचाही भडका उडणार आहे.

गॅस सबसिडी केवळ ४०.१० रुपये

केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरची सबसिडी जून २०२० पासून ४०.१० रुपये स्थिर केली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये ६४४ रुपये दर होते, तेव्हाही ४०.१० रुपये सबसिडी होती आणि दर हजारापार गेल्यानंतरही तेवढीच सबसिडी मिळत आहे. सिलिंडरची खुल्या बाजारपेठेकडे वाटचाल असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरवाढीमुळे महागाई भडकणार

केंद्र सरकारने सर्व पेट्रोलियम पदार्थ जीएसटीमध्ये आणण्याची गेल्या काही वर्षांपासून मागणी आहे. इंधनाची मूळ किंमत कमी तर त्यावर कर जास्त आहे. हा कर सर्वांनाच भरावा लागतो. यातून गरिबांना वगळावे. आजच्या दरवाढीमुळे महागाई आणखी भडकणार आहे.

गजानन पांडे, पश्चिम क्षेत्रीय संघटन मंत्री, अ.भा. ग्राहक पंचायत

दरवाढीतून गरिबांना वगळा

इंधनाच्या दरवाढीमुळे महागाईचा भडका उडणार आहे. आता सुरुवात असून, पुढे किमती आणखी वाढतील. त्याचा थेट परिणाम गरिबांच्या दैनंदिन जीवनावर होईल. केंद्र सरकारने दरवाढीतून गरिबांना वगळावे. दरवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

देवेंद्र तिवारी, राष्ट्रीय महासचिव, अ.भा. ग्राहक कल्याण परिषद

बस झाले, दरवाढ करू नका

जीवनावश्यक वस्तूंच्या किमती आधीच मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. महिन्याचे बजेट बिघडले आहे. तुलनेत उत्पन्न कमी झाल्याने चिंता वाढली आहे. गॅस सिलिंडरची दरवाढ नकोच.

विद्या समर्थ, गृहिणी

 

सिलिंडर आवाक्याबाहेर

गॅस सिलिंडरची किंमत हजारापार आवाक्याबाहेर गेली आहे. सबसिडी काढून घेतली आहे. त्यामुळे त्याच दरात सिलिंडर खरेदी करावे लागते. सरकारने सिलिंडरचे दर ५०० रुपयांवर आणावेत.

ममता वैरागडे, गृहिणी

Web Title: Cylinder rate above one thousand; Inflation soared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.