दादासाहेबांनी सेवेचा महासेतू उभारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:20 AM2017-07-30T01:20:42+5:302017-07-30T01:21:25+5:30
दादासाहेबांनी जोपासलेल्या ऋणानुबंधामुळे अनेकजण त्यांच्याशी जोडले गेले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दादासाहेबांनी जोपासलेल्या ऋणानुबंधामुळे अनेकजण त्यांच्याशी जोडले गेले. त्यांनी अनेक गरजूंसाठी शिक्षणाची दारे मोकळी करून अनेकांचे जीवन प्रकाशमान करून सेवेचा महासेतू उभारला, असे गौरवोद्गार क्रिष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस कराडचे कुलगुरु डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी काढले.
स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या विसाव्या पुण्यस्मरणानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित समारंभात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. व्यासपीठावर शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या परमाणू शास्त्र विभागाचे प्रमुख पी. डब्ल्यू. देशकर, काँग्रेसचे नेते अनंतराव घारड, दादासाहेब काळमेघ स्मृती महाविद्यालयाचे संस्थापक शरद काळमेघ, आमदार प्रकाश गजभिये, दंत महाविद्यालयाचे राजेंद्र सिंग, माजी कुलसचिव सुभाष बेलसरे उपस्थित होते.
डॉ. वेदप्रकाश मिश्रा म्हणाले, दादासाहेबांमध्ये असलेल्या असामान्य निडरतेमुळे त्यांच्यात त्वरित निर्णय घेण्याची क्षमता होती. त्यामुळे अनेकजण घडले. त्यांच्यात सामाजिक कटिबद्धता होती. त्यांच्या काळात विद्यापीठावर विद्यार्थ्यांचे मोर्चे यायचे. परंतु तेंव्हा विद्यार्थी नेते सलोख्याने बोलणी करून हसतमुखाने परत जात. आताच्या सारखे त्यावेळी बाऊन्सर वापरण्याची प्रथा विद्यापीठात नसल्याची टीका त्यांनी यावेळी बोलताना केली.
प्राचार्य देवेंद्र बुरघाटे म्हणाले, गरिबीची जाणीव असल्यामुळे दादासाहेबांनी अनेक गरजूंना मदत केली. जीवनात त्यांनी मूल्याला महत्त्व देऊन वाटचाल केल्याचे त्यांनी सांगितले. आमदार प्रकाश गजभिये म्हणाले, फुले, शाहू महाराजांचा वारसा दादासाहेब काळमेघ यांनी समर्थपणे सुरू ठेवून तो विद्यापीठात राबविला. त्यांनी आपल्या कणखर नेतृत्वाने बहुजनांचे राज्य निर्माण केल्याचा उल्लेख त्यांनी केला. दादासाहेब काळमेघ स्मृती दंत महाविद्यालयाचे शरद काळमेघ यांनी प्रास्ताविकातून दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
यावेळी माधव गावंडे यांनी दादासाहेब काळमेघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भजन सादर केले. कार्यक्रमाला नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.