खापरखेड्याच्या ठाणेदाराची दबंगगिरी

By admin | Published: December 20, 2015 03:15 AM2015-12-20T03:15:51+5:302015-12-20T03:15:51+5:30

रेतीमाफिया आणि अवैध धंदे व्यावसायिकांना अभय देणाऱ्या ठाणेदाराबाबत वृत्त प्रकाशित होताच तीळपापड होऊन पत्रकाराविरुद्धच गुन्हा दाखल केला.

Dabangagiri of Khaparkheda | खापरखेड्याच्या ठाणेदाराची दबंगगिरी

खापरखेड्याच्या ठाणेदाराची दबंगगिरी

Next

पत्रकारावर गुन्हा दाखल : धमकी देणाऱ्या ठाणेदाराविरोधातही तक्रार
नागपूर : रेतीमाफिया आणि अवैध धंदे व्यावसायिकांना अभय देणाऱ्या ठाणेदाराबाबत वृत्त प्रकाशित होताच तीळपापड होऊन पत्रकाराविरुद्धच गुन्हा दाखल केला. हा प्रकार नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे घडला. येथेच ठाणेदाराचा प्रताप थांबला नाही तर सदर पत्रकाराला धमकीसुद्धा दिली. त्यामुळे याबाबत ‘त्या’ ठाणेदाराविरुद्ध त्याच्याच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे ठिकठिकाणच्या पत्रकार संघाने निषेध नोंदविला आहे. सोमवारी याबाबत नागपूर जिल्हा पत्रकार संघाचे शिष्टमंडळ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.
भीमराव टेळे असे या खापरखेडा येथील ठाणेदाराचे नाव आहे. अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांना अभय, अवैध दारूविक्रीला आळा न घालणे यासह इतर कारणांमुळे आजूबाजूच्या गावातील नागरिकांचा ठाणेदारावर रोष आहे. रोहणा, वलनी, बिनासंगम, गोसेवाडी यासह परिसरातील रेतीघाटांतून अवैधपणे रेती वाहतूक सुरू आहे. या रेती वाहतुकीमुळे रोहणा, भानेगाव, बिनासंगमसह इतर गावातील नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे या रेती वाहतुकीला आळा घालण्याची मागणी केली होती. याबाबत खापरखेडा पोलिसांना माहिती देत रेती वाहतुकीला लगाम घालण्याची सूचना केली होती, तरीही ही अवैध रेती वाहतूक सुरूच होती. याच कारणामुळे रोहणा येथील नागरिक संतप्त होऊन तणावाची स्थिती झाली होती. तेव्हा ठाणेदाराने रेतीमाफियांची बाजू उचलून धरत एकप्रकारे अवैध रेती वाहतूक आणि रेतीचोरीचे समर्थन केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी त्याच दिवशी गावात आमसभा घेतली. त्यात महसूल विभागातील अधिकाऱ्यांसह पोलिसांनाही हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. सभेत अवैध धंदे आणि रेती वाहतुकीला बंदी घालण्याची मागणी नागरिकांनी रेटून धरली, तरीही या भागातून खुलेआम अवैध रेती वाहतूक सुरूच आहे.
दुसरीकडे सिल्लेवाडा, भानेगाव, रोहणा येथे अवैध दारूविक्री होत असल्याने महिलांची कुचंबणा होत. दारूड्यांच्या त्रासामुळे महिलांना घराबाहेर पडणे कठीण झाले. परिणामी अवैध दारूविक्री करणाऱ्यांचा बंदोबस्त लावण्याची मागणी नागरिकांनी केली. त्या मागणीकडेही ठाणेदार टेळेने दुर्लक्ष केले. त्यामुळे महिलांनीच पुढाकार घेत अवैध दारूविक्री करणाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. अवैध दारूविक्री बंद करण्याच्या प्रमुख मागणीसाठी सिल्लेवाडा, भानेगाव, रोहणा येथील ३०० हून अधिक महिलांनी खापरखेडा पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून रोष व्यक्त केला तर सिल्लेवाडासह आजूबाजूच्या गावातील महिलांनी गुरुवारी रात्रीच्या सुमारास दारू पकडली. ती दारूही पोलिसांच्या स्वाधीन केली. एवढा प्रकार होऊनही खापरखेडा पोलीस अवैध दारुविक्री बंद करण्याबासाठी एक पाऊल पुढे टाकत नाही. हा सर्व प्रकार आतापर्यंत वृत्ताच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणला. त्यामुळे ठाणेदाराने वृत्त लिहिणाऱ्या पत्रकारावरच गुन्हा नोंदविला. अवैध धंदे बंद करण्याऐवजी पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार असून याबाबत नागपूर जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या तालुका पत्रकार संघाने निषेध नोंदविला. (जिल्हा प्रतिनिधी)

ग्रामपंचायतींनीही घेतला ठराव
खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावांत गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे वाढले आहे. अवैध रेती वाहतूक, रेती चोरीचे प्रकारही वाढले आहेत. मात्र त्यावर लगाम घालण्यात खापरखेडा पोलिसांना यश आले नाही. मात्र याबाबत वृत्त प्रकाशित होताच पत्रकारावरच गुन्हा दाखल करण्यासाठी हेच पोलीस पुढे आले. त्यामुळे या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. खापरखेडा परिसरात अवैध धंदे वाढल्याबाबत ग्रामपंचायतींनीही ठरावाद्वारे खापरखेडा पोलीस ठाण्याला सूचित करून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. सोबतच ‘ठाणेदार हटाव’चीही भूमिका अनेक ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आली.

ठाणेदाराला कुणाचे अभय?
गेल्या काही महिन्यांपासून ठाणेदार टेळे सतत नानाविध कारणांमुळे चर्चेत आहे. याबाबत भानेगाव येथील २०० हून अधिक नागरिकांनी आ. सुनील केदार, सरपंच रवी चिखले यांच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षकांच्या नावे ५ आॅक्टोबर रोजी निवेदन दिले. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह या सुटीवर असल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश शिंदे यांच्याकडे निवेदन सोपविले. त्यात ठाणेदाराची बदली करावी, ही मागणी त्यांनी रेटून धरली. यासोबतच भाजपच्या खापा मंडळाचे उपाध्यक्ष नितीन गोस्वामी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही निवेदन सोपविले. त्या निवेदनाची प्रत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्याकडे पाठविली. खापरखेडा परिसरातील ग्रामपंचायतींनीही ‘ठाणेदार हटाव’ची भूमिका घेतली. मात्र अद्यापपर्यंत ठाणेदारावर कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या ठाणेदाराला अभय कुणाचे, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Web Title: Dabangagiri of Khaparkheda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.