नागपूरच्या अंबाझरीतील कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयावर दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:00 PM2018-08-25T22:00:29+5:302018-08-25T22:01:39+5:30
कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयातील सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून बंधक बनविल्यानंतर कार्यालयात तोडफोड करून ६ दरोडेखोरांनी ४ लाख, ७३ हजारांची रोकड लुटून नेली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी पहाटे ३.१५ ते ४ च्या सुमारास हा दरोडा पडला. आज सकाळी तो उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयातील सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून बंधक बनविल्यानंतर कार्यालयात तोडफोड करून ६ दरोडेखोरांनी ४ लाख, ७३ हजारांची रोकड लुटून नेली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी पहाटे ३.१५ ते ४ च्या सुमारास हा दरोडा पडला. आज सकाळी तो उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
जुने वर्मा ले-आऊटमध्ये ए. एस. अय्यर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. चे कार्यालय आहे. कार्यालयात २४ तास वेगवेगळे सुरक्षा रक्षक तैनात असतात. शुक्रवारी रात्री कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर कंपनीचे भागीदार आणि त्यांचे सहकारी कर्मचारी कार्यालय बंद करून आपापल्या घरी गेले. रात्रीच्या वेळी अशोक दीपानी नामक सुरक्षा रक्षक कर्तव्यावर होते. पहाटे ३.१५ च्या सुमारास दोन दरोडेखोर आले. त्यांनी दीपानीच्या गळ्यावर धारदार चाकू ठेवला आणि त्यांच्याकडून कार्यालयाच्या चाव्या हिसकावून त्यांना पहिल्या माळ्यावर नेले. या दोघांच्या पाठोपाठ पुन्हा चार दरोडेखोर आले. त्यांनी दीपानीच्या तोंडावर चिकट पट्टी चिकटवली. दीपानींना धमकी देऊन एका खोलीत डांबल्यानंतर कार्यालयातील विविध कक्षांच्या कपाटाची तोडफोड केली. त्यात ठेवलेली एकूण ४ लाख, ७३ हजारांची रोकड लुटून नेली. दरोडेखोर पळून गेल्यानंतर दीपानींनी स्वत:ची कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर अय्यर यांना फोन करून दरोड्याची माहिती दिली. अय्यर हे चेन्नईला निघाले असल्यामुळे त्यांनी त्यांचे भागीदार संजय दिगांबर तांबे (वय ५५, रा. खामला) यांना सांगितले. तांबे यांनी कार्यालयात जाऊन चौकशी केली. त्यानंतर अंबाझरी पोलिसांना कळविले. ठाणेदार भीमराव खंदाळे यांनी लगेच पोलीस उपनिरीक्षक एस. पी. अंबुरे तसेच आपल्या ताफ्यासह वर्मा ले-आऊटमध्ये धाव घेतली. माहिती कळताच सहायक आयुक्त राजेंद्र बोरावके, परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित, गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम, अतिरिक्त आयुक्त बी. जी. गायकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. माहिती घेतल्यानंतर आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकं कामी लावले.
श्वान घुटमळले, परत फिरले !
शहरातील मध्यवर्ती भागात दरोडा पडल्यामुळे पोलिसांनी ठसेतज्ज्ञ तसेच श्वानपथक घटनास्थळी बोलवून घेतले. श्वानाने काही अंतरापर्यंतच दरोडेखोरांचा मार्ग दाखवला. त्यानंतर ते तेथेच घुटमळले आणि परत फिरले. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले असता दोन मोटरसायकलवर चार दरोडखोर एका मार्गाने आले तर दोन दरोडेखोर दुसऱ्या मार्गाने आले आणि त्यांनी हा दरोडा घातल्याचे दिसून आले. एकूणच घटनाक्रम बघता या कार्यालयाची दरोडेखोरांना माहिती असावी, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.