नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे काँग्रेस महासचिवांच्या घरावर दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 08:12 PM2018-09-21T20:12:44+5:302018-09-21T20:13:43+5:30
तीन दरोडेखोरांनी काँग्रेसचे प्रदेश महासचिव मुजीब पठाण यांच्या आई व पत्नीला चाकूचा धाक दाखवित त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. याच धावपळीत मुजीब पठाण यांचे धाकटे बंधू घराबाहेर पडले आणि त्यांनी त्यांच्या चुलत भावांसह इतरांना मदतीला बोलावले. दरोडेखोरांपैकी एकाने त्यांच्या डोक्यावर रॉडने वार करून त्यांना जखमी केले. मात्र, नागरिकांनी सावधगिरी बाळगत तिन्ही दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुटीबोरी येथे गुरुवारी मध्यरात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तीन दरोडेखोरांनी काँग्रेसचे प्रदेश महासचिव मुजीब पठाण यांच्या आई व पत्नीला चाकूचा धाक दाखवित त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हिसकावून घेतली. याच धावपळीत मुजीब पठाण यांचे धाकटे बंधू घराबाहेर पडले आणि त्यांनी त्यांच्या चुलत भावांसह इतरांना मदतीला बोलावले. दरोडेखोरांपैकी एकाने त्यांच्या डोक्यावर रॉडने वार करून त्यांना जखमी केले. मात्र, नागरिकांनी सावधगिरी बाळगत तिन्ही दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना बुटीबोरी येथे गुरुवारी मध्यरात्री घडली.
प्रवीण माणिक मंजुळकर (२९, रा. पिंपळगाव, ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा), मन्नूसिंह जनरलसिंह ताक (४०, रा. दुर्गापूर-नेरी, जिल्हा चंद्रपूर) व वसीमशाह गोलूशाह (२६, रा. नेर पिंगळाई, ता. मोर्शी, जिल्हा अमरावती) अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत. मुजीब पठाण पक्षाच्या कामानिमित्त हिंगोलीला गेले होते. तिघांनी मध्यरात्रीनंतर लोखंडी रॉडने स्वयंपाकघराचे दार तोडून आत प्रवेश केला. त्यांनी पहिल्यांदा मुजीब पठाण यांच्या आई व वडिलांना धमकावून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने हिसकावून घेतले. त्यानंतर त्यांनी पठाण यांच्या पत्नीच्या खेलीत प्रवेश करीत त्यांना चाकूचा धाक दाखवित जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्याकडील रोख रक्कम व सोन्याचे दागिने हिसकावून घेतले.
दोघांनी त्यांना पहिल्या माळ्यावरील मुजीब पठाण यांच्या लहान भावाच्या खोलीत नेले. तेथील दागिने व रोख रक्कम घेऊन परत तळ मजल्यावर आले. त्यांनी घरातून पळ काढताच अकबर पठाण, कयुम पठाण यांच्यासह नागरिकांनी तिन्ही दरोडेखोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यांच्याकडून ११ लाख १ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि एक लाख रुपये रोख असा एकूण असा एकूण १२ लाख १ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बुटीबोरी येथे वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकात दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी भादंवि ३९४, ४५२, ४५९, ३४ अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
अकबर पठाण जखमी
या धावपळीत मुजीब पठाण यांचे लहान भाऊ अकबर पठाण हे दरोडेखोरांची नजर चुकवून बाहेर आले आणि त्यांनी त्यांच्या वामन नामक चौकरीदाराला जागे केले. शिवाय, त्यांच्या चुलत भावासह इतरांना मदतीसाठी सूचना केली. त्याचवेळी दरोडेखोर पळून जात असताना अकबर यांनी एका दरोडेखोराला पकडले. या झटापटीत दरोडेखोराने त्यांच्या डोक्यावर रॉडने प्रहार केल्याने ते जखमी झाले. त्याचवेळी कयुम पठाण (चुलत भाऊ) घटनास्थळी आले. दरोडेखोर एमएच-३५/एन-२३ क्रमांकाच्या मोटरसायकलने पळून जात असतानाच कयूम पठाण यांनी त्यांच्या कारने मोटरसायकलला धडक दिली. दरोडेखोर दुचाकी सोडून पळून जात असतानाच नागरिकांनी मोठ्या शिताफीने त्यांना पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले.
इनोव्हाचे टायर पळविले
आठ दिवसांपूर्वी (दि. १३) चोरट्यांनी मुजीब पठाण यांच्या एमएच-४०/एसी-२९३६ क्रमांकाच्या इनोव्हाचे दोन टायर चोरून नेले. ही इनोव्हा घराच्या ‘पोर्च’मध्ये उभी होती. या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली असून, अद्यापही चोरट्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यातच ही दरोड्याची घटना घडली. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.