बापरे...डेंग्यूचे रोज ६ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:08 AM2021-09-18T04:08:38+5:302021-09-18T04:08:38+5:30
नागपूर : एका डासाने नागपूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची व्यवस्थाच कोलमडून टाकली आहे. मागील ९ वर्षाच्या तुलनेत पहिल्यांदाच या वर्षी ...
नागपूर : एका डासाने नागपूर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची व्यवस्थाच कोलमडून टाकली आहे. मागील ९ वर्षाच्या तुलनेत पहिल्यांदाच या वर्षी डेंग्यूच्या रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. आतापर्यंत तब्बल १,७२४ रुग्णांची नोंद झाली, तर मृत्यूचा आकडा ८ वर पोहचला आहे. डेंग्यूचे रोज सरासरी ६ नवे रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे.
‘एडीस इजिप्ती’ प्रजातीच्या डासांच्या मादीद्वारे डेंग्यूचा संसर्ग पसरतो. हे डास चिकुनगुनिया, पिवळा ताप आणि झिका विषाणूच्या संक्रमणास देखील कारणीभूत ठरतात. परंतु तूर्तास तरी चिकुनगुनिया, पिवळा ताप किंवा झिका विषाणूचे रुग्ण आढळून आले नाही. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच डेंग्यूने थैमान घातले आहे. लांबलेला पाऊस, डेंग्यू डासांची पैदास पाच ‘एमएल’ पाण्यातही होत असल्याने व घरेच डेंग्यू डासांच्या उत्पत्तीची केंद्र ठरल्याने रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. नागपूर जिल्ह्यात जानेवारी महिन्यात ३, फेब्रुवारी महिन्यात ५, मार्च महिन्यात ३, एप्रिल महिन्यात शून्य, मे महिन्यात ८, जून महिन्यात १०६, जुलै महिन्यात ४८८, ऑगस्ट महिन्यात ७९४, १४ सप्टेंबरपर्यंत ३१७ रुग्णांची नोंद झाली आहे.
-शहरात २०१९ नंतर सर्वाधिक रुग्णांची नोंद
नागपूर शहरात प्रथमच डेंग्यूच्या तीन आकडी रुग्णांची संख्या २०१२ मध्ये दिसून आली. २३७ रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ उडाली. त्यानंतर २०१३ मध्ये २४०, २०१४ मध्ये ६०१, २०१५ मध्ये २३०, २०१६ मध्ये १९५, २०१७ मध्ये १९९, २०१८ मध्ये ५६५, २०१९ मध्ये सर्वाधिक ६२७, २०२० मध्ये सर्वात कमी १०७, तर १४ सप्टेंबर २०२१ पर्यंत ७०८ रुग्णांची नोंद झाली.
-असा वाढतोय डेंग्यूचा धोका
महिना : शहर रुग्ण: ग्रामीण रुग्ण
जानेवारी :०२ : ०१
फेब्रुवारी : ०१ :०४
मार्च : ०३ :००
एप्रिल : ०० :००
मे : ०६ : ०२
जून : ८६ (३) :२० (०२)
जुलै : २५२ :२३६ (०१)
ऑगस्ट : २६७ : ५२७
सप्टेंबर : ९१ (२) : २२६
(कंसात मृत्यूची संख्या आहे.)