मध्य भारतातील ज्येष्ठ फुटबॉल संघटक दादा मित्रा यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 11:17 AM2018-02-22T11:17:30+5:302018-02-22T11:18:44+5:30
वैदर्भीय फुटबॉल क्षेत्रात ‘दादा’ या नावाने ख्यातीप्राप्त ज्येष्ठ संघटक दुर्गा पाडो मित्रा यांचे बुधवारी निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैदर्भीय फुटबॉल क्षेत्रात ‘दादा’ या नावाने ख्यातीप्राप्त ज्येष्ठ संघटक दुर्गा पाडो मित्रा यांचे बुधवारी निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. मोक्षधाम घाट येथे बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंंस्कार पार पडले.
सुरेंद्रनगरच्या २४२ रणजित अपार्टमेंट येथे वास्तव्यास असलेले दादा सहा महिन्यानंतर वयाची शंभरावी गाठणार होते. त्यांच्या पश्चात बहीण, जावई आणि मोठा आप्तपरिवार आहे. मध्य रेल्वेत कार्यरत असताना त्यांनी अनेक वर्षे मध्य रेल्वे इन्स्टिट्यूटचे सचिवपद सांभाळले. विदर्भ फुटबॉल संघटनेचे सचिव तसेच मध्य प्रदेश फुटबॉल संघटनेचे सहसचिवपदही त्यांनी भूषविले. १९७० साली स्थापन झालेल्या नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेचे दादा हे संस्थापक सचिव होते. खेळातील सेवेबद्दल त्यांना १९९१ साली महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कामावर निष्ठा असलेले दादा यांची कठोर प्रशासक अशी ओळख होती. सरदार अटलबहादूरसिंग यांचे अत्यंत जीवलग मित्र अशी ख्याती त्यांनी मिळविली होती. दादा यांच्या निधनाबद्दल झालेल्या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी माजी आ. एस. क्यू. झामा होते. यावेळी टी.एन.सिध्रा, व्हीएचए सचिव विनोद गवई, एनडीएफए अध्यक्ष हरेश व्होरा, नगरसेवक तन्वीर अहमद, सत्तार अन्सारी, सलीम बेग, युजीन नॉर्बट, इक्बाल काश्मिरी, विजय रगडे, गुरुमूर्ती पिल्ले, यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला.