'डागा' दोन तास अंधारात, बाळंतिणी नवजात शिशूंना घेऊन वॉर्डाबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 10:20 AM2023-06-06T10:20:01+5:302023-06-06T10:22:51+5:30
या रुग्णालयात रविवारी २५० वर महिला भरती होत्या. तर, ‘नियोनेटल इंटेंसिव केयर यूनिट’मध्ये (एनआयसीयू) २३ नवजात बालके उपचाराखाली होती.
नागपूर : डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात रविवारी दोन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली. अनेक बाळंतीण महिला आपल्या नवजात शिशूंना घेऊन वॉर्डाबाहेर येऊन बसल्या. जनरेटरमुळे ‘लेबर रूम’ व लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात वीज सुरू असल्याने मोठा धोका टळला.
रविवारी रात्री ८:३० वाजता डागा रुग्णालयाबाहेरील ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड आल्याने या भागातील वीज खंडित झाली. संपूर्ण रुग्णालय अंधारात बुडाले. ३६५ खाटा असलेल्या या रुग्णालयात रविवारी २५० वर महिला भरती होत्या. तर, ‘नियोनेटल इंटेंसिव केयर यूनिट’मध्ये (एनआयसीयू) २३ नवजात बालके उपचाराखाली होती. अर्धा तास होऊन वीज परत न आल्याने काही बाळंतीण महिलांनी आपल्या बाळाला घेऊन वॉर्डाबाहेर आल्या. ज्यांना बाहेर येणे अशक्य होते त्यांचे नातेवाईक मोबाइलचा टॉर्च सुरू करून वारा देत होते. वॉर्डात अंधार असलातरी कर्तव्यावर असलेले डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी मोबाइलच्या उजेडात रुग्ण सेवा देत होते. नातेवाइकांनी संयम राखत त्यांना मदत करीत असल्याचे चित्र होते. रात्री १०:३० वीज परत आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
- लेबर रुम, एनआयसीयू उजेडात
डागा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले, रुग्णालयात जनरेटरची सोय आहे. यामुळे ‘लेबर रूम’ व ‘एनआयसीयू’मध्ये वीज होती. एकही बाळ व्हेंटिलेटरवर नव्हते. या शिवाय, जनरेटरमधून प्रत्येक वॉर्डात एक-एक लाईट देण्यात आला. यामुळे कुठेही उपचार थांबले नव्हते. कोणाचाही जीव धोक्यात आलेला नव्हता.