डागा आदर्श संस्था व्हावी
By admin | Published: July 29, 2014 12:48 AM2014-07-29T00:48:24+5:302014-07-29T00:48:24+5:30
प्रदीर्घ काळ विदर्भातील स्त्रियांना अविरत सेवा देणारे डागा स्मृती शासकीय स्त्रीरोग रुग्णालय हे आदर्श संस्था म्हणून पुढे यावे, अशी अपेक्षा आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी व्यक्त केली.
सुजाता सौनिक : १२५ वर्षांनिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन
नागपूर : प्रदीर्घ काळ विदर्भातील स्त्रियांना अविरत सेवा देणारे डागा स्मृती शासकीय स्त्रीरोग रुग्णालय हे आदर्श संस्था म्हणून पुढे यावे, अशी अपेक्षा आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी व्यक्त केली.
डागा रुग्णालयाला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करताना त्या बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नावाडे, डॉ. पी.बी. दास, रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली खेडीकर व डॉ. पूर्णचंद्रबाबू खेडीकर उपस्थित होते.
सौनिक म्हणाल्या, रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह, ४८ खाटांचे नवजात शिशु अतिदक्षता विभाग यासहित इतर सुविधा नव्याने निर्माण करून अतिशय सुयोग्य उदाहरण राज्यासमोर ठेवले आहे.
त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे शासनसुद्धा या रुग्णालयाचे ५०० खाटांचे रुग्णालय श्रेणीवर्धन करून आपण सर्वांच्या कामाच्या क्षमतेबद्दल विश्वास दाखविला आहे, असे म्हणून त्यांनी परिचारिका आणि रुग्ण यांचे संबंध कसे असावे, रुग्णांची काळजी कशी घ्यावी, त्यांचे समुपदेशन कसे करावे, स्वत:च्या प्रकृतीकडेही कसे लक्ष द्यावे, यावर मार्गदर्शन केले.
त्या म्हणाल्या, तुमची स्पर्धा खासगी रुग्णालयाशी आहे. यामुळे ज्या पद्धतीने तेथील वातावरण असते, साफसफाई असते तसे या शासकीय रुग्णालयातही व्हायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक डॉ. खेडीकर यांनी केले. (प्रतिनिधी)
डायरियाने ११०० बालकांचा मृत्यू
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सुजाता सौनिक म्हणाल्या, राज्यात मागील वर्षी डायरियाने (अतिसार) ११०० बालकांचा मृत्यू झाला. मुंबई आणि ठाण्यात ३५० तर अहमदनगर येथे १२६ बालके या आजाराने दगावली. यामुळे २८ जुलैपासून ‘अतिसार नियंत्रण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. दोन आठवडे चालणाऱ्या या कार्यक्रमात आरोग्य सेवक आणि आशा वर्करकडून घरोघरी जिंकच्या गोळ्या व आरएसओचे पाऊच पोहोचविण्यात येतील; सोबतच आजार झाल्यास घ्यावयाची काळजी याचे समुपदेशनही करण्यात येईल.